
आनंदाने भरलेली बारामती अजित पवार यांच्या निधनाने पूर्णपणे पोरकी झालेली पाहिली, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधीमंडळात अजित पवार यांना जड अंतकरणाने श्रद्धांजली वाहिली. तसेच अजित दादांसारखा एक भरोसेमंद, दिलदार सहकारी आणि मित्र गमावला असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, विधिमंडळाचं या वर्षीचं हे पहिलं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनाची सुरुवात आपण सर्वजण एका दुःखी अवस्थेमध्ये करत आहोत. आजपर्यंत नेहमी सभागृहात दिसणारे, आपले वाटणारे अजित दादा आज या सभागृहात किंवा या विधिमंडळात दिसत नाहीत. ही खंत आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. माणसं येतात, माणसं जातात. माणसं असताना त्यांचं महत्त्व कधी कळत नाही आणि ती नसतात तेव्हा त्यांचं महत्त्व कळून काही उपयोग होत नाही. अनेक जण असे असतात की जी जवळ असताना कळत नाहीत; पण काही जण असे असतात की जी जवळ आल्यानंतर आपल्याला व्यवस्थित कळतात.
या विधिमंडळामध्ये अनेकांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अजित दादांसोबत झाली असेल. काळ एकच आहे, साहजिकच आहे. विशेषतः माझ्या कारकिर्दीची सुरुवात ही अजित दादांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या विचारधारेच्या विरोधातली होती. आम्ही कधी एकत्र येऊ, असं ध्यानीमनी सुद्धा वाटलं नव्हतं. अजित दादांबद्दल म्हणायचं झालं तर दोन सकाळी अशा होत्या. त्यातली एक सकाळ ही महाराष्ट्राला त्यांच्या कृतीने धक्का देणारी होती आणि दुसरी सकाळ ही महाराष्ट्राला चटका देणारी होती, अंतःकरणाला चटका देणारी होती.
आम्ही कधी एकत्र येऊ, असं आम्हाला वाटलं नव्हतं. हे जे मी आपल्याला सांगितलं, त्यावेळेला साहजिकच आहे की दोन्ही पक्ष हे राजकीय दृष्ट्या एकमेकांच्या विरोधात होते. एकत्र आलो, अनपेक्षितपणे एकत्र आलो. आणि एकत्र आल्यानंतर साहजिकच आहे की मनामध्ये, नाही म्हटलं तरी, अडचण होती. त्याआधीची सकाळ मी आपल्याला सांगितली आणि त्यानंतर ही व्यक्ती माझ्यासोबत एक तर मला प्रशासनाचा अनुभव नव्हता अचानक या सभागृहात किंवा या विधिमंडळात आलो तो मुख्यमंत्री म्हणून आलो.
कामकाज कसं चालवायचं? त्याच्यात सहकारी सगळे विरोधातले होते. अजित दादांसारखा एक सहकारी, ज्यांनी एक धक्का दिला होता, आणि आपल्या सोबत उपमुख्यमंत्री म्हणून बसणार हे थोडंसं त्यावेळेला, नाही म्हटलं तरी, अनपेक्षित होतं. पण जसजसं कामकाज सुरू झालं, तेव्हा मला कळलं, आणि ती भावना आजही माझ्या मनात कायम आहे, ती नेहमी कायम राहील की अजित दादांसारखा एक भरोसेमंद, उत्तम, दिलदार, केवळ सहकारीच नव्हे तर मित्र मी गमावला. शासकीय किंवा प्रशासकीय कामकाजामध्ये एक खंबीर मला पाठिंबा होता, आधार होता. कोणतीही गोष्ट, काही एखादी कळली नाही तर अजित दादांबरोबर मी बोलायचो. एवढा विषयाचा सखोल अभ्यास करणारा सहकारी किंवा लोकप्रतिनिधी अभावानेच आढळलेला. आजसुद्धा त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते सहा वेळा उपमुख्यमंत्री होते, हे तर आहेच; पण विशेष म्हणजे एका मोठ्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करणं हे फार अवघड असतं. काही जणांना आयुष्यभर वृक्षाच्या सावलीत राहावं लागतं, वृक्षाच्या सावलीचा आधार घ्यावा लागतो; पण काही जण असे असतात की त्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची एक ओळख निर्माण करतात. त्यातले एक अजित दादा होते.
मी मुख्यमंत्री असताना दोन-तीन वेळा बारामतीला जाण्याचा योग आला. काही ना काही कार्यक्रम होते. शेवटी जेव्हा गेलो होतो, तेव्हा अजित दादा माझ्यासोबत मुंबईपासून त्या पूर्ण कार्यक्रमात होते. आणि तो काळ असा होता की माझ्या तब्येतीची तक्रार होती, म्हणजे मला उभं राहणंसुद्धा शक्य नव्हतं. तेव्हा अजित दादा मुद्दाम माझ्यासोबत आले होते. संपूर्ण रस्त्याने फिरताना मोठ्या उत्साहात बारामतीचा केलेला कायापालट ते मला दाखवत होते “इकडे आधी काय होतं, आता मी काय केलं.” आणि हे सगळं बघणं अचंबित करणारं होतं. कारण बारामतीत त्या आधी मला तसं जाणं काही झालेलं नव्हतं. ते सगळे रस्ते असतील, मोठ्या संस्था असतील, मग विद्यालय असतील अनेक गोष्टी अजित दादा मला उत्साहाने दाखवत होते. “सीएम साहेब, इकडे आधी अमुक होतं, आम्ही असं केलं.”
आणि तीच बारामती, ज्यावेळेला दुर्घटना घडली आणि मध्यरात्रीच्या सुमारास आम्ही, मी तिकडे सहकुटुंब गेलो, तेव्हा ती बारामती पोरकी झालेली मला वाटली. निशब्द तर होतीच, मध्यरात्र झालेली होतीच; पण त्यावेळेला आनंदाने भरलेली बारामती पूर्णपणे पोरकी झालेली मला जाणवली. हे माणसाचं वैशिष्ट्य असतं.
अर्थखातं तर त्यांनी सांभाळलंच; पण जेव्हा लॉकडाऊनमध्ये मंत्रालय बंद होतं आणि जवळपास अर्थचक्र थांबते की काय अशी परिस्थिती होती, त्याही वेळेला या माणसाने कसा काय तो समतोल साधला? कोणतीही योजना बंद पडू न देता महाराष्ट्राचं अर्थचक्र सुरू ठेवलं हे फार मोठं कौशल्य आहे, जे अजित दादांकडे होतं. कर्जमुक्ती तर आम्ही आधी केलीच होती. ती कर्जमुक्ती पार पाडणं गरजेचं होतं. पैशाचे स्रोत सगळे थांबलेले होते; पण तरीदेखील कर्जमुक्ती करून दाखवली.
शिवभोजन ही गोरगरिबांसाठी जी योजना आम्ही सुरू केली होती, ती दहा रुपयांची थाळी पाच रुपयांत करणं हे गरजेचं होतं. पैशाची आवक काही नव्हती; पण तरीसुद्धा अजित दादांनी ते करून दाखवलं. अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील. त्याही काळामध्ये मंत्रालय बंद होतं; पण महाराष्ट्र बंद नव्हता. महाराष्ट्र चालू होता. त्याचे सगळे कारभार, उद्योग आणि विकासकामं सुरू होती.
शिवसेना प्रमुखांच्या नावाने आपण समृद्धी महामार्ग केला आहे, तोसुद्धा त्यांनी थांबू दिला नव्हता. अटल सेतूचं काम त्यांनी थांबू दिलं नव्हतं. लॉकडाऊनच्या काळात हे सगळं सुरू ठेवणं फार मोठं जिकिरीचं होतं. हे कसं काय त्यांनी केलं, हेही एक कसब आहे. आज आपण त्यांची आठवण काढतो. ही आठवण नेहमी आपल्याला येत राहील. पण मी माझ्या या भावनिक बोलण्याच्या सुरुवातीला जे म्हटलं माणसं असताना त्यांचं महत्त्व कळत नाही, माणसं गेल्यानंतर कळून उपयोग नसतो.
अलीकडच्या काळामध्ये अजित दादांचं एक वक्तव्य आहे की ज्यांनी त्यांच्यावर 70 हजार कोटींचे घोटाळ्याचे आरोप केले, त्यांच्यासोबत ते आज सत्तेत आहेत. हे मी का सांगतोय? कारण एखादी व्यक्ती असते तेव्हा आपण तिला इतकं बदनाम करतो की नकोसा जीव करतो, आणि मग तीच व्यक्ती आपल्यातून गेल्यानंतर अचानक आपली वाटायला लागते. मला असं वाटतं की या निमित्ताने आपण सगळ्यांनी एक मर्यादा पाळण्याची गरज आहे. कोणाला किती बदनाम करायचं? आयुष्यातून खरंच किती उठवायचं? तोही माणूसच आहे.
अजित दादांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधी खचून दिलं नाही. एखादा दुसरा माणूस असता तर तो खचला असता. दुर्दैवाने अपघातात त्यांचं निधन झालं; एखादा खचलेल्या मनाचा असता तर कदाचित जीव दिला असता. पण ही संस्कृती आपल्या महाराष्ट्राची नाही. एखादा माणूस चुकतो; पण तो खरंच चुकलाय का, याची खातरजमा करणं गरजेचं असतं. त्यांनी कधी माझ्याकडे येऊन असं सांगितलं नाही की “आता काय करायचं? एवढं सगळं माझ्यावर आहे.” त्यांनी त्या सगळ्या आरोपांना आपल्या कामातून उत्तर दिलं. आणि असं उत्तर दिलं की ज्यांनी आरोप केले होते, त्यांनीही त्यांना सहकारी म्हणून स्वीकारलं. आम्हीही त्यांना सहकारी म्हणून स्वीकारलं.
आज या सभागृहात असा एकही व्यक्ती नाही ज्याने दादांच्या कामाचा जवळून अनुभव घेतलेला नाही. दादांचा स्वभाव थोडासा तापट होता. त्यांच्या आवाजात नैसर्गिक भारदस्तपणा होता. त्यांच्यासमोर अधिकारीसुद्धा थोडे दडपून असायचे. अनेकदा कळायचंच नाही हे कौतुक आहे की दम? पण ती त्यांची शैली होती. बोलायचं तर बिनधास्त बोलायचं. काम करायचं तर बेधडकपणे, बेलाशकपणे करायचं. कारण त्यांच्या मनात कुठे पाप नव्हतं. एकदा मनात पाप नसेल, तर केलेल्या कृतीबद्दल पश्चात्ताप राहत नाही.
त्यांनी अत्यंत अडचणीच्या काळात महाराष्ट्राचं अर्थखात सांभाळलं. मला कोणताही अनुभव नसताना माझ्या मंत्रिमंडळात त्यांनी उत्तम आणि भरोसेमंद सहकारी म्हणून काम केलं. वेळेचं काटेकोर पालन ही त्यांची सवय होती. दादा 11 वाजता येणार म्हणजे 11 वाजताच त्यांची गाडी दारात उभी असायची. आल्यानंतर विषय घेऊन यायचे. विषय संपला की फापटपसारा न करता “बरं सीएम साहेब, मी निघतो” असं म्हणायचे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी पाहिलं आहे इतरांच्या टेबलावर कागद पसरलेले असायचे; पण दादांच्या समोरचं टेबल व्यवस्थित असायचं. पेन, कागद काटकोनात ठेवलेले असायचे. हे मी आवर्जून सांगतो कारण अशी शिस्त कारभारातही दिसते. एखादी गोष्ट जरी तिरकी असेल तर ती सरळ लावण्याची सवय असेल, तर कामही तसंच काटेकोर होतं.
आज आपण सगळे एका अशा दुःखात आहोत की सगळ्यांनाच वाटतं आपल्याजवळचं कोणीतरी गेलं. मी माझा एक चांगला मित्र गमावला, हे माझं वैयक्तिक दुःख आहे; पण महाराष्ट्राने एक उमदं नेतृत्व गमावलं आहे, हे राज्याचं मोठं नुकसान आहे.
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राने ज्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, आर. आर. आबा आणि आता अजित दादा. नेतृत्व उंचीवर पोहोचतं आणि अचानक निघून जातं. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. हे दुःख केवळ पवार कुटुंबावर नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रावर कोसळलं आहे. त्यांच्यासोबतच विधान परिषदेतील स्वरूपसिंग नाईक, अशोक मोडक, गंगाधर पटणे, नीला देसाई या सर्वांचाही आपण उल्लेख करतो. नीला देसाई या आमच्या पक्षाच्या होत्या, महिला आघाडीच्या पदाधिकारी होत्या. धडपड करणारी माणसं, संधीचं सोनं करणारी माणसं अशी माणसं अचानक निघून जातात.
या निमित्ताने मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, माणसं असताना त्यांचं महत्त्व ओळखलं पाहिजे. त्यांचे गुण राज्याच्या भल्यासाठी वापरले पाहिजेत. राजकीय मतभेद असतील; पण बदनामीची मर्यादा ओलांडू नये. आज अत्यंत भारावलेल्या आणि जड अंतःकरणाने मी अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. असे सहकारी, असे मित्र पुन्हा पुन्हा मिळत नाहीत. मी माझ्या तर्फे, माझ्या कुटुंबीयांतर्फे आणि माझ्या पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो. पुढचं वाक्य बोलणंही कठीण आहे; पण त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच माझी प्रार्थना.



























































