प्रेमविवाह हा कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा नाही…; प्रयागराज हायकोर्टाची टिप्पणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रौढ व्यक्तींनी स्वतःच्या पसंतीने लग्न करणे हा कुटुंबाच्या सन्मानाचा किंवा प्रतिष्ठेचा मुद्दा होऊ शकत नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी प्रयागराज उच्च न्यायालयाने केली.

अलीगढच्या जोडप्याने आर्य समाज मंदिरात विवाह केला होता. त्यांच्याकडे मॅरेज सर्टिफिकेटही आहे. मात्र मुलीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध आहे. जोडप्याने न्यायालयाला सांगितले की, मुलीच्या कुटुंबीयांकडून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ऑनर किलिंगची त्यांना भीती वाटतेय. त्यांच्या जिवाला धोका आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना उच्च न्यायालयाने या जोडप्याला संरक्षण देण्याचे निर्देश पोलिसांना दिले. मुलीच्या वैवाहिक आयुष्यात हस्तक्षेप करू नका, मुलीच्या घरी जाऊ नका किंवा तिला फोन करू नका, असा इशारा तिच्या कुटुंबीयांना दिला.

प्रशासनाची जबाबदारी
न्यायालय म्हणाले, दोन प्रौढवयीन व्यक्ती आपल्या मर्जीने लग्न करतात, तेव्हा त्यांचे जीवन, स्वातंत्र्य आणि संपत्तीचे रक्षण करणे हे प्रशासनाचे काम आहे. त्यांना कुटुंबीयांकडून धोका असताना संरक्षण दिले पाहिजे. न्यायालयाने अंतरिम निर्णय देताना याचिकाकर्त्यांना सध्या अटक करू नका असे सांगितले. संबंधित दोन्ही पक्षांना दोन आठवडय़ांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे