अभिजीत यादवच्या हत्येचे गूढ उकलले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। लखनौ

उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सभापती रमेश यादव यांचा धाकटा मुलगा अभिजीत यादव याच्या हत्येचे गूढ उकलले आहे. अभिजीतची हत्या केल्याप्रकरणी त्याची आई मीरा यादव यांना अटक करण्यात आली आहे. अभिजीत मद्यधुंद अवस्थेत होता व आपल्याशी गैरवर्तन करत होता म्हणून ओढणीने गळा आवळून त्याची हत्या केली अशी कबुली मीरा यांनी दिली आहे.

अभिजीतने मला मारण्याचाही प्रयत्न केला होता. यामुळे स्वत:च्या बचावासाठी मी अभिजीतला मारलं. नंतर ओढणीने गळा आवळून त्याची हत्या केली व ती ओढणी जाळून टाकली. असे मीरा यांनी पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात म्हटले आहे. रमेश यादव यांचा मोठा मुलगा अभिषेक यादव याने तक्रार केल्यानंतर मीरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत मीरा यांनी अभिजीतची हत्या केल्याची कबुली दिली. अभिषेकने आईविरोधात भादंवि कलम ३०२ अंतर्गत न्यायालयात खटला दाखला केला आहे.

मीरा या रमेश यादव यांची दुसरी पत्नी आहे. त्यांची पहिली पत्नी उत्तर प्रदेशमधील एटा येथे कुटुंबीयांसोबत राहते. ज्या फ्लॅटमध्ये अभिजीतची हत्या झाली तो रमेश यांचा असून तेथे रमेश , मीरा ,अभिजीत व अभिषेक यादव राहत होते. २१ ऑक्टोबरला अभिजीतचा मृतदेह दारुल शफा येथे सापडला होता. सुरुवातीला अभिजीतचा मृत्यू नैसर्गिक मृत्यू झाल्याचे यादव कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले होते. पण पोस्टमार्टम मध्ये अभिजीतची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समोर आले.