
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे मेट्रोत छेडछाड केल्याचा प्रकार घडला होता. या विकृत तरुणाला मेट्रो प्रशासनाने आयुष्यभराची अद्दल घडवली आहे.
लखनौ येथील आलमबाग मेट्रो स्टेशनवर एका तरुणीसोबत छेडछाड करण्यात आली होती. या प्रकरणी तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर तो तिथून पळून गेला होता. सीसीटीव्हीच्या मदतीने त्याला पकडण्यात आलं होतं.
मेट्रो प्रशासनाने पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिलं होतं. त्यातून पोलिसांनी आरोपीला शोधून त्याची ओळख पटवली. मेट्रो कार्डावरून त्याचा नंबरही शोधण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली.
मात्र, आता मेट्रो प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. आता लखनौमधील 21 मेट्रो स्टेशनवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना महिलांच्या सुरक्षिततेविषयी खास निर्देश देण्यात आले आहेत. तसंच आरोपीची ओळखही या कर्मचाऱ्यांना देण्यात आली असून त्याचं कार्ड आयुष्यभरासाठी रद्द करण्यात आलं आहे. आता हा तरुण पुन्हा कधीच मेट्रोने प्रवास करू शकणार नाही, अशी घोषणा मेट्रोने केली आहे.




























































