पंतप्रधान घरकुल योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा, छत्रपती संभाजीनगरात ईडीच्या 9 ठिकाणी धाडी

पंतप्रधान घरकुल योजनेच्या टेंडरमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणात ईडीने शहरात 9 ठिकाणी छापेमारी केली. यात काही बिल्डरांसह महापालिकेतून ईडीने या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. मनपासह ६ नगर परिषदा, नगरपंचायतच्या निविदा रिंग करण्याच्या हेतूने एकाच आयपी अ‍ॅड्रेसवरून भरण्यात आल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही बिल्डर तसेच महापालिकेच्या अधिकार्‍यांची झाडाझडती होणार असल्याने खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने पडेगाव, सुंदरवाडी, तीसगाव, चिकलठाणा आणि हर्सूल येथे 127 हेक्टरवर पंतप्रधान घरकुल योजना प्रस्तावित करण्यात आली असून, 40 हजार सदनिका बांधण्यात येणार आहेत. या सदनिकांच्या बांधकामासाठी 4 हजार 600 कोटी रुपयांची निविदाही काढण्यात आली. परंतु, घरकुल बांधणीसाठी योग्य जागा नसतानाही योजना उभारण्याचा आटापिटा करण्यात आला. समरथ कन्स्ट्रक्शनला हे काम देण्यात आले. परंतु, प्रकल्प उभारणीसाठी योग्य जागा नसताना आणि त्या जागेवर 39 हजार घरे बांधण्याचे नियोजन करण्यात आल्याचा आक्षेप घेत स्थानिक लोकप्रतिनिधींनी याविषयी तक्रार केली. ई-निविदा प्रक्रियेतील अटींचा भंग करून सुमारे 1 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय आल्यामुळे पंतप्रधान कार्यालयाने हे प्रकरण ईडीकडे सोपविले होते.

स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी सकाळीच ईडीचे पथक छत्रपती संभाजीनगरात धडकले. पानदरिबा भागातील नाज गल्लीत असलेले समरथ कन्स्ट्रक्शन्सचे अमर बाफना यांचा बंगला, जवाहरनगर पोलीस ठाण्याजवळील कार्यालय, समर्थनगरमधील बाफना यांचे नातलग, आकाशवाणीसमोरील अहिंसानगरातील डॉ. सतीश रुणवाल यांच्या घरासह 9 ठिकाणी एकाच वेळी ईडीच्या अधिकार्‍यांनी छापा मारला. यावेळी ईडीच्या अधिकार्‍यांना स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला होता. ईडीच्या अधिकार्‍यांनी दिवसभर चौकशी करून अनेक कागदपत्रे ताब्यात घेतली.

मनपात ईडीची झाडाझडती

ईडीच्या पथकाने शहरात दाखल होताच मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्याशी संपर्क करून या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी केली. डॉ. चौधरी हे बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी या योजनेसाठी प्राधिकृत करण्यात आलेले अधिकारी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्याशी संपर्क करण्याची विनंती केली. त्यानंतर ईडीचे पथक मनपात धडकले. अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या हाती पथकाने कागदपत्रांची लांबलचक यादी दिली. मनपाने उपलब्ध करून दिलेली सर्व कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली. दरम्यान, मनपाच्या उपायुक्त तसेच पंतप्रधान घरकुल योजनेच्या प्रमुख अपर्णा थेटे यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

6 नगरपालिकांमध्ये मिळाली वर्कऑर्डर

पंतप्रधान घरकुल योजनेसाठी समरथ कन्स्ट्रक्शन्ससह त्यांच्या भागीदार कंपन्यांना ६ नगरपालिकांमध्ये घरकुल बांधण्यासाठी वर्कऑर्डर मिळाली आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, गंगापूर, सोयगाव, बीड जिल्ह्यातील माजलगाव, नगर जिल्ह्यातील राहाता, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड या 6 नगरपालिकांचा समावेश आहे. वर्कऑर्डर मिळाली, तरीही या ठिकाणी अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. या ठिकाणीदेखील एकाच आयपी अ‍ॅड्रेसवरून निविदा भरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

असे आहे प्रकरण

पंतप्रधान घरकुल योजनेचे कंत्राट समरथ कन्स्ट्रक्शनला देण्यात आले. मात्र, कंत्राटदाराची एकूण आर्थिक क्षमता आणि उपलब्ध जागेवर उभ्या राहणार्‍या सदनिका याबाबत गृहनिर्माण विभागाला शंका आली. त्यानंतर दोन स्वतंत्र चौकशी समित्यांनी या योजनेचा धांडोळा घेतला. नियमबाह्य पद्धतीने निविदा काढण्यात आल्याचा निष्कर्ष या समितीने काढला. या निविदा प्रक्रियेनंतर १ हजार कोटी रुपयांचा घोटाळा होऊ शकतो, अशी शक्यता चौकशी समितीने व्यक्त करून निविदा प्रक्रिया रद्द करण्याची शिफारस केली. घरकुल योजनेसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण योजनेचा तपशीलच तपासण्यात आला. यात गोलमाल असल्याचे स्पष्ट होताच गृहनिर्माण विभागाने निविदा प्रक्रियाच रद्द केली. विशेष म्हणजे समरथ कन्स्ट्रक्शनसह इतर दोन कंपन्यांनी चक्क एकाच आयपी अ‍ॅड्रेसवरून निविदा भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तिन्ही कंपन्यांनी जॉइंट व्हेंचर भरल्याने मनपाची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

तीन कंपन्यांच्या 19 संचालकांवर गुन्हा

पंतप्रधान घरकुल घोटाळ्यात मनपाच्या तक्रारीवरून समरथ कन्स्ट्रक्शन, समरथ मल्टीबीज इंडिया प्रा.लि. चे संचालक अमर अशोक बाफना, पूजा अमर बाफना, मे. सिद्धार्थ प्रॉपर्टीजचे नीलेश वसंत शेंडे, अभिजित वसंत शेंडे, योगेश रमेश शेंडे, स्वप्निल शशिकांत शेंडे, नवनिर्माण महिला बहुउद्देशीय संस्थेचे प्राधिकृत प्रतिनिधी हरीश मोहनलाल माहेश्वरी, सुंदर कन्स्ट्रक्शनचे सतीश भागचंद रुणवाल, इंडो ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस तसेच इंडो ग्लोबल इन्प्रâास्ट्रक्चर सर्व्हिसेसचे रितेश राजेंद्र कांकरिया, हितेश मनसुख कर्नावट, अभिनव रेनबो डेव्हलपर्स प्रमोटर्सचे भागीदार श्यामकांत जे. वाणी, सुनील पी. नहार, हरिओम नवोदय बहुउद्देशीय संस्थेचे प्राधिकृत प्रतिनिधी प्रवीण भट्टड, इस्सर टॉवर्स, जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस तसेच जग्वार ग्लोबल सर्व्हिसेसचे भागीदार सुनील मिश्रीलाल, आनंद फुलचंद नहार, न्याती इंजिनीअर्स कन्सल्टंट प्रा.लि. संचालक नितीन द्वारकादास न्याती, पीयूष नितीन न्याती, प्रवीण नितीन न्याती, गुंजल अ‍ॅण्ड असोसिएट्सचे प्राधिकृत प्रतिनिधी मनोज अर्जुन गुंजल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.