
बनावट नकाशांच्या आधारे मालाडच्या मढ येथे उभारण्यात आलेली नऊ अनधिकृत बांधकामे मुंबई महापालिकेने जेसीबीच्या सहाय्याने आज जमीनदोस्त केली आहेत. दरम्यान, ही कारवाई पुढे सुरू राहणार असून अतिक्रमण करून बांधलेली 130 बांधकामे टप्प्याटप्प्याने जमीनदोस्त केली जाणार आहेत, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
मढ येथे बनावट नकाशाच्या आधारे अनधिकृतपणे बांधण्यात आलेला बंगला पाडल्यानंतर आता पालिका प्रशासनाने या मोहिमेला अधिक गती दिली आहे. बनावट नकाशाच्या आधारे मढ येथे अनधिकृतपणे बांधलेली आणखी नऊ बांधकामे पालिकेच्या पी- उत्तर विभाग कार्यालयाच्या वतीने जमीनदोस्त करण्यात आली. तीन जेसीबी आणि अन्य संयंत्राच्या सहाय्याने हे पाडकाम करण्यात आले. या कारवाईदरम्यान महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. पालिका उपायुक्त भाग्यश्री कापसे आणि पी-उत्तरचे सहाय्यक आयुक्त पुंदन वळवी यांच्या नेतृत्वात ही कारवाई सुरू आहे.
अशी झाली कारवाई
एरंगळ गावाच्या परिसरातील 1500 चौरस फूट क्षेत्रफळावर अनधिकृतपणे बांधण्यात आलेला ‘प्रीत’ नामक बंगला 5 मे रोजी पाडण्यात आला. आज एरंगळसह वाळनई परिसरातील आणखी नऊ बांधकामांवर कारवाई करण्यात आली. यापैकी सहा बांधकामे भास्कर भोपी मार्गावरील तसेच तीन बांधकामे जोडमार्गावरील आहेत. यामध्ये 500 चौरस फूट, 300 चौरस फूट आणि 200 चौरस फूट क्षेत्रफळांची प्रत्येकी दोन बांधकामे तसेच 1500 चौरस फूट, 1300 चौरस फूट, 2500 चौरस फूट क्षेत्रफळाच्या प्रत्येकी एका अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे.