
माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी नांदणी मठाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, राज्य सरकारही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून आपली भूमिका मांडेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीच्या प्रश्नावरून आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी नांदणी मठाचे प्रतिनिधी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. गेल्या 34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे. तिला काही दिवसांपूर्वीच गुजरातच्या अंबानींच्या वनतारा येथे हलवण्यात आले. त्याविरोधात कोल्हापूरकर प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरले होते. त्यांनी अंबानींच्या जिओ तसेच अन्य उत्पादनांवर बहिष्कार घातला होता. त्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आज याप्रश्नी बैठक बोलावून चर्चा केली.
माधुरीची काळजी घेण्यासाठी पशुतज्ञांचे पथक तयार करणार
मठानेही आपल्या याचिकेमध्ये राज्य शासनाचा समावेश करावा. वन विभागाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र सविस्तर भूमिका मांडण्यात येईल. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निकषाप्रमाणे व उच्चस्तरीय समितीने सुचविलेल्या सर्व मुद्दय़ांचे निराकरण त्यात करण्यात येईल. हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य शासन एक पथक तयार करून आवश्यक ती सर्व मदत करेल. आवश्यक वाटल्यास रेस्क्यू सेंटरसारखी व्यवस्थाही करण्यात येईल व त्याप्रमाणे सुविधा देण्यात येतील. या सर्व बाबींचा समावेश करून त्या तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयास स्वतंत्र समिती नेमण्याची विनंतीही राज्य शासनामार्फत याचिकेमध्ये करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्याचप्रमाणे याप्रकरणी नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असेही आश्वासन त्यांनी दिले. महाराष्ट्रातील जे हत्ती बाहेर नेण्यात आले अशा सर्व हत्तींची माहिती वन विभागाने गोळा करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीला खासदार धैर्यशील माने व विशाल पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, विश्वजीत कदम, सतेज पाटील, अशोक माने, सदाभाऊ खोत, राहुल आवाडे, अमल महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे, नांदणी मठाचे स्वस्तीश्री जिनसेन महास्वामीजी, जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी आदी उपस्थित होते.