मध्य प्रदेशात काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न, मोठी आमिषे दाखवल्याचा भाजपवर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार अस्थिर करण्याचे भाजपने पुन्हा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप केला जात आहे. मंगळवारी रात्री काँग्रेसचे आणि अपक्ष असे मिळून एकूण 8 आमदार हरयाणातील गुरुग्राम इथल्या एका हॉटेलमध्ये डांबून ठेवले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. यानंतर मध्य प्रदेशमधील काँग्रेसने त्यांनी धावपळ करत या आमदारांना बाहेर काढल्याचे सांगण्यात येत आहे. हा सगळा प्रकार कमलनाथ यांचे सरकार पाडण्यासाठी केला गेला असल्याचा काँग्रेस नेत्यांना संशय आहे.

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी आरोप केला आहे की माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि भाजप नेते नरोत्तम मिश्र हे काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी आमदारांना 25 ते 35 कोटींची लालूच दाखवत आहेत. कमलनाथ यांनी या घडामोडींनंतर दावा केला आहे की त्यांचे सरकार स्थिर असून कोणीही चिंता करू नये.

मंगळवारी रात्री मध्य प्रदेशचे अर्थमंत्री तरूण भानोट यांनी या राजकीय घडामोडींसंदर्भात बोलत असताना सांगितले की भाजपने काँग्रेसचे 4 बसपाचे 2 समाजवादी पक्षाचा 1 आणि एका अपक्ष आमदाराला गुरुग्राम इथल्या आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये डांबून ठेवलं होतं. या आमदारांची भेट घेण्यासाठी जेव्हा जितू पटवारी आणि जयवर्धन सिंह हे कमलनाथ सरकारमधील मंत्री पोहोचले तेव्हा त्यांना भेट नाकारण्यात आली. या आमदारांवर पाळत ठेवण्यासाठी हरयाणाचे पोलीस तैनात करण्यात आले होते. अखेर भानोट स्वत: या आमदारांची भेट घेण्यासाठी हॉटेलवर गेले.

काँग्रेसचे इतर नेत्यांनीही या आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. काही वेळाने जितू पटवारी आणि जयवर्धन सिंह यांना बसपच्या आमदार रामबाई यांना बाहेर काढण्यात यश आलं. भानोट यांनी दावा केला आहे की 8 पैकी 6 आमदार बाहेर काढण्यात आले असून इतर दोघांशी संपर्क झाला आहे. जयवर्धन सिंह यांनी या नाट्याबाबत बोलताना म्हटले की भाजपला पराभव सहन झालेला नाहीये ज्यामुळे ते हे प्रकार करत आहेत. भाजपचे नेता नरोत्तम मिश्रा हे आपल्याला हॉटेलबाहेर दिसल्याचंही काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेशात एकूण 230 आमदार असून त्यातील 114 आमदार काँग्रेसकडे आहेत. भाजपकडे 107 आमदार आहेत. तर उरलेले 9 आमदार हे बसपा, समाजवादी पक्ष आणि अपक्ष आहेत. मध्य प्रदेशात सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक आमदारांची संख्या ही 116 आहे. काँग्रेसने 121 आमदारांची संख्या दाखवत सत्ता स्थापन केली होती.