
सामना ऑनलाईन । चेन्नई
विवाहबाह्य संबंध एक समाजिक विकृत बनली असून त्यामुळे दिवसेंदिवस गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ ही चिंताजनक आहे. असे म्हणतानाच त्यामागे टिव्ही सिरिअल किंवा सिनेमा अशा घटानांना कारणीभूत आहे का? हे तपासा असे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र केंद्र सरकार आणि राज्य सरकारला केले आहेत. गेल्या 10 वर्षांत घडलेल्या अशाप्रकारच्या अपराधाबाबतची आकडेवारी सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
विवाहबाह्य संबंध अपराध नाही! बाहेरख्याली पुरुषांना मोठा दिलासा
विवाहबाह्य संबंधातून 2017 मध्ये एक हत्या झाली होती. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन किरुबाकरन यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने या खटल्यातील आरोपीची पोलीस कोठडी रद्द करताना काही निरीक्षणे नोंदवून हे निर्देश दिले आहेत. विवाहबाह्य संबंधामध्ये झपाट्याने होणाऱ्या वाढीमागे टिव्हीवरील सिरिअल किंवा सिनेमा कारणीभूत आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. पती पत्नीचे आर्थिक स्वातंत्र्य, लैंगिक असमर्थता, सोशल मीडिया, पाश्चिमात्य विचारधारेचा प्रभाव, कुटुंबाला योग्य वेळ न देणे ही विवाहबाह्य संबंधांची प्राथमिक कारणे आहेत हे न्यायालयाला जाणून घ्यायचे असल्याचेही ते म्हणाले. अनैतिक संबंधातून हत्या, अपहरण व हल्ल्यांसारख्या घटनांमध्ये सतत वाढ होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. अनेक प्रकरणांमध्ये पती किंवा पत्नी आपल्या विवाहबाह्य संबंधांमध्ये आड येणाऱ्या साथीदाराची हत्या करतात. तसेच अनेकदा लहान मुलांचा देखील यामध्ये हकनाक बळी घेतला जातो, असेही न्यायालयाने नमूद केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या जून महिन्यात होणार आहे.

दरम्यान, या सुनावणीवेळी त्यांनी निवृत्त न्यायाधीश आणि तज्ज्ञांची एक समिती नेमण्याचा सल्ला देखील दिला. या समितीकडून सामाजिक परिस्थितीला समजून घेत हे संकट दूर करून नागरिकांसाठी समूपदेशन केंद्रे उभी करण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्यात अशी समूपदेशन केंद्र असणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.

हिंदुस्थानात लग्नसंस्था ही प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि नैतिक मूल्यांना धरून असलेल्या अपेक्षांवर आधारित आहे. इथे विवाहाला पवित्र मानले जाते. त्यामुळे संस्थेला मोठे महत्व आहे. मात्र असे असताना देखील अनैतिक संबंधामुळे या पवित्र अशा विधीनंतर देखील कुटुंब व्यवस्थेला तडे जात आहेत, अशी टिपण्णी देखील न्यायालयाकडून करण्यात आली आहे.

























































