वेगवान बुद्धिबळाचा कार्लसन जगज्जेता

बुद्धिबळाच्या पटावर वेग, अचूकता आणि मानसिक ताकदीचा सर्वोच्च संगम म्हणजे मॅग्नस कार्लसन. नॉर्वेच्या या सुपरस्टारने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत वर्ल्ड ब्लिट्झ चॅम्पियनशिपचा किताब नवव्यांदा जिंकला आणि ‘वेगवान बुद्धिबळाचा जगज्जेता’ हा किताब आपलाच असल्याचे अधोरेखित केले.

कार्लसनने अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या ग्रँडमास्टर नोदिरबेक अब्दुसत्तोरोव याच्यावर 2.5-1.5 असा रोमहर्षक विजय मिळवत किताबावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच त्याने वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप जिंकली होती. त्यामुळे दोहामध्ये कार्लसनने रॅपिड आणि ब्लिट्झ या दोन्ही जागतिक किताबांवर वर्चस्व गाजवले.

अंतिम फेरीतील लढत अत्यंत चुरशीची ठरली. पहिल्या तीन सामन्यांनंतर गुणफलक 1.5-1.5 असा बरोबरीत होता. चौथ्या सामन्यात ड्रॉ स्वीकारण्याऐवजी कार्लसनने आक्रमक खेळ करत निर्णायक विजय खेचून आणला आणि जगज्जेतेपदाची मोहोर उमटवली. किताब जिंकल्यानंतर कार्लसन म्हणाला, स्पर्धेची सुरुवात माझ्यासाठी कठीण होती, पण नॉकआऊट टप्प्यात मी खेळाचा पुरेपूर आनंद घेतला. वेगवान बुद्धिबळात आत्मविश्वास आणि धाडस हाच विजयाचा मंत्र आहे.

अर्जुन एरिगैसीची ऐतिहासिक झेप

या स्पर्धेत हिंदुस्थानचा युवा ग्रॅण्डमास्टर अर्जुन एरिगैसी यानेही जागतिक व्यासपीठावर आपली छाप पाडली. 22 वर्षीय अर्जुनने शानदार खेळ करत कांस्यपदक पटकावले. स्विस लीगच्या 19 फेऱयांनंतर तो 15 गुणांसह अव्वल स्थानी होता, मात्र उपांत्य फेरीत अब्दुसत्तोरोवकडून 0.5-2.5 असा पराभव पत्करावा लागला.

तरीही वर्ल्ड ब्लिट्झमध्ये कांस्यपदक जिंकणारा अर्जुन विश्वनाथन आनंद यांच्यानंतरचा दुसरा हिंदुस्थानी पुरुष खेळाडू ठरला, हे विशेष. याआधी त्याने वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्येही कांस्यपदक जिंकत आपली सातत्यपूर्ण गुणवत्ता सिद्ध केली आहे.

एकूणच, दोहामध्ये कार्लसनने वेगवान बुद्धिबळाचा सम्राट असल्याचा ठसा उमटवला, तर अर्जुन एरिगैसीने हिंदुस्थानच्या बुद्धिबळ परंपरेला नवी उंची दिली.