वसुली थांबवा, अन्यथा धडा शिकवू! पनवेल पालिकेवर महाविकास आघाडीची धडक

पनवेल महानगरपालिकेच्या अवास्तव व जनतेच्या दिशाभूल करणाऱ्या ‘मालमत्ता कर’ वसुलीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह महाविकास आघाडीतील घटक पक्ष आज रस्त्यावर उतरले. सुविधांचा पत्ता नाही आणि कर कसले लादता? ही जुलमी वसुली तत्काळ रद्द करा, नाहीतर धडा शिकवू अशा जोरदार घोषणा देत शेकडो कार्यकत्यांनी मोर्चा काढला. या आंदोलनात नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन महापालिकेवर धडक दिली.

मोर्चामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबन पाटील, बाळ माने, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, संजोग वाघेरे-पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, मनसेचे योगेश चिले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत पार्टील, रामदास पाटील, महानगरप्रमुख अवचित राऊत, शहरप्रमुख प्रवीण जाधव, कॅप्टन कलावत, हेमराज म्हात्रे, शशिकला सिंग, नारायण घरत, राजेश केणी, अॅड. विजय गडगे, प्रकाश म्हात्रे, प्रदीप ठाकूर, रेवती सपकाळ, अनिता डांगरकर, अर्चना कुळकर्णी, उज्ज्वला गावडे, श्रुती म्हात्रे, अश्विनी देसाई, महादेव वाघमारे, यतीन देशमुख, सदानंद शिर्के, प्रकाश म्हसकर, गुरुनाथ पाटील, विश्वास पेटकर सहभागी झाले होते.

…तर प्रशासनाला शिवसेना स्टाईलने धडा शिकवू!

शिवसेना उपनेते बबन पाटील यांनी पालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, प्रशासनाने तत्काळ जुलमी करवाढ रद्द करा, नाहीतर शिवसेना स्टाईलने धडा शिकवू असा इशारा दिला, तर जिल्हाप्रमुख शिरीष घरत म्हणाले, सर्वांना समजणारी पारदर्शक करप्रणाली अंगीकारावी, केवळ ‘शास्ती माफी’ नव्हे तर मालमत्ता करातही सवलत द्यावी तसेच अवास्तव कर त्वरित मागे घ्यावी असे ठणकावले. माजी आमदार बाळाराम पाटील यांनी स्टील मार्केटचा २६८ कोटींचा LBT कर माफ केला, पण सामान्य जनतेला फक्त व्याज माफी अशी टिका केली.

नवी मुंबई विमानतळाच्या फलकांना काळे फासले

पनवेल महापालिकेने शहरात अनेक भागात नवी मुंबई विमानतळ असे दिशादर्शक फलक लावले आहेत. मात्र या फलकांवर लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नसल्याने संताप व्यक्त होत असून आज महाविकास आघाडीच्या कार्यकत्यांनी या फलकांना काळे फासत केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला.