
शहराजवळील रांजणवाडी येथील कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी आलेल्या पालिका व वैद्यकीय पथकावर रुग्णांच्या नातेवाईकांसह इतरांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. या दगडफेकीत एका वाहनाचे नुकसान झाले असून, पथकातील अधिकारी, डॉक्टरांनी पळ काढल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी 100 ते 125 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पालिका व ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने गुरुवारी रांजणवाडी वसाहतीत रॅपिड ऍण्टीजेन टेस्टसाठी शिबीर आयोजित केले होते. शिबिरात 46 जणांची टेस्ट करण्यात आली. त्यात एका गरोदर महिलेसह सातजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दोन गरोदर महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उरलेल्या रुग्णांना घेऊन जाण्यासाठी पालिकेचे अधिकारी, डॉक्टर व त्यांचे सहकारी रांजणवाडी येथे वाहनांचा ताफा घेऊन पोहचले; परंतु, या रुग्णांना बरोबर घेऊन जाण्यास येथील लोकांनी विरोध केला.
पालिकेच्या पथकावर रांजणवाडी येथे जमावाने हल्ला केल्यामुळे कर्मचार्यांनी आज ‘काम बंद’ आंदोलन केले. हल्लेखोरांवर तातडीने कडक कारवाई करण्याच्या मागणीबरोबरच अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी कर्मचार्यांना संरक्षण मिळावे. हल्ल्यात नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळावी, अशा मागण्या कर्मचार्यांनी मुख्याधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केल्या. मुख्याधिकार्यांनी कर्मचार्यांसोबत चर्चा करून ठोस आश्वासन दिल्यानंतर दुपारनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
अशाप्रकारे हल्ला करून काहीही साध्य होणार नाही. पालिका प्रशासन व वैद्यकीय पथक गेले तीन महिने नागरिकांच्या सुरक्षेसाठीच झटत आहे. अशा स्थितीत नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले पाहिजे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. तुमच्या सहकार्याशिवाय काहीही होणार नाही. – पल्लवी भोरे-पाटील, मुख्याधिकारी, महाबळेश्वर पालिका.

























































