
महाडमधील तारिक गार्डन इमारत सोमवारी संध्याकाळी कोसळली होती. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 18 तासानंतर एक मृतदेह काढण्यात एनडीआरएफचे पथक आणि स्थानिक प्रशासनाला यश आले आहे. नाविक जावेद जोमाने ( वय 30) असे ढिगाऱ्याखूलन काढलेल्या मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यामुळे आतापर्यंत या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप 17 जणांचा शोध सुरू आहे. नाविक जोमाने यांचे या इमारतीत कार्यालय होते. दुपारी ते कार्यालयात झोपले होते. त्यानंतर ही दुर्घटना घडली. इमारत कोसळल्यानंतर 18 तासांनी त्यांचा मृतदेह ढिगाऱ्याबाहेर काढण्यात यश आले. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. नाविक यांचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.
या दुर्घटनेतून एक चार वर्षाची मुलगी बचावली आहे. त्या मुलीला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. तिच्या हाताला मार लागला आहे. या दुर्घटनेतून ही चार वर्षांची मुलगी बचावल्याने समाधान व्यक्त होत आहे. या चिमुरडीने तब्बल 18 तास मृत्यूशी झुंज दिली आहे.


























































