
महाड नगर परिषद निवडणुकीत सुशांत जाबरे व इतरांवर हल्ला करीत त्यांच्या वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र मागील २७ दिवसांपासून विकास गोगावले फरार आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध तडीपारीची कारवाई करावी यासाठी महाडकर एकवटले आहेत. आज महाडमधील विविध पक्षांचे पदाधिकारी, समाजसेवक, ग्रामस्थ यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गठित विकास गोगावलेला तडीपार करण्याची मागणी केली. तसे निवेदन पोलीस उपअधीक्षक (गृह) उत्तम रिकामे यांना देण्यात आले.
२ डिसेंबर २०२५ रोजी महाड नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना मतदान केंद्राबाहेर अजित पवार गटाचे सुशांत जाबरे आणि त्यांचे सहकारी यांना विकास गोगावले आणि त्याच्या समर्थकांनी मारहाण केली. तसेच जाबरे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास गोगावले फरार झाला आहे. उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळून लावला आहे. मात्र २७ दिवसांनंतरही रायगड पोलिसांना विकास गोगावले याला अटक करण्यात अपयश आले आहे. विकास गोगावले याच्यामुळे महाडमध्ये दहशतीचे वातावरण आहे. याआधीही त्याच्यावर चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे विकास गोगावल याला हद्दपार करावे अशी मागणी महाडकरांनी पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे केली.
“पोलीस अधीक्षक कामानिमित्त बाहेर असल्याने भेट होऊ शकली नाही. पोलीस उपअधीक्षक यांच्यावर निवेदन स्वीकारताना दडपण दिसून आले. यामुळे ते काय कारवाई करतील याबाबत शंका आहे. मात्र आरोपींवर कारवाई न केल्यास आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू.”
सोमनाथ ओझर्डे, महाड विधानसभा समन्वयक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
नेमके काय झाले होते?
महाड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुशांत जाबरे व इतरांवर हल्ला करण्यात आला. तसेच त्यांच्या वाहनांची तोडफोडही झाली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाडमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. त्याचे गंभीर परिणाम आगामी जिल्हा परिषद निवडणुकीवरही होण्याची शक्यता आहे.

























































