
सामना प्रतिनिधी, बीड
बीडच्या विशाल पांढरे या धनगर समाजाच्या तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी थेट पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांना फोन केला आणि आरक्षणाचे काय झाले, अशी विचारणा केली तेव्हा आरक्षण नाय महत्त्वाचं, आधी पक्षाचं काम करायचं! 30 वर्षांत राष्ट्रीय समाज पक्षाला किती वेळा मतं दिलीत, असा सवाल करत ‘मत दुसऱ्याला द्यायची आणि आरक्षण आम्हाला मागायचे’ असे खळबळजनक उत्तर जानकरांनी दिले. त्यांच्या उपरोक्त संभाषणाची क्लिप व्हायरल झाली असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजत असून आरक्षणाचे काय झाले, असा प्रश्न आता समाजातून विचारला जात आहे. ‘भाजपने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. आपण आता भाजपसोबत आहात त्या आश्वासनाचे काय झाले?’ असा प्रश्न बीड येथील धनगर समाजाच्या विशाल पांढरे या तरुणाने थेट महादेव जानकर यांना विचारल्यानंतर भ्रमणध्वनीवरून बोलताना महादेव जानकर म्हणाले, ”आपण पक्षाचे काम करता का? आपल्या पक्षाचे महाराष्ट्रात किती आमदार, खासदार आहेत? आरक्षण पाहिजे असेल तर आमदार, खासदार निवडून येणे महत्वाचे आहे. मतं दुसऱ्याला द्यायचे आणि आरक्षण आम्हाला मागायचे गेल्या तीस वर्षांत आपल्या रासप पक्षाला किती वेळा मतदान केले”, असा सवाल जानकरांनी उपस्थित करून ताकद वाढली पाहिजे तरच आरक्षण मिळेल असे म्हटले.
त्यांच्या संभाषणाची ही क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून सर्वत्र फिरत आहे. जानकरांच्या अशा उत्तराने धनगर समाजात संताप व्यक्त केला जात आहे.

























































