महादेव मुंडे यांच्या पत्नी व कुटुंबाने केला आत्मदहनाचा प्रयत्न

परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील तपास वर्षभरापासून ठप्प आहे. संतप्त झालेल्या त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. आज आपल्या कुटुंबासह त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांच्या हातातील पेट्रोलच्या बाटल्या जप्त केल्या. यावेळी त्यांच्या कुटुंबाशी पोलिसांची झटापटही झाली.

दोन वर्षापूर्वी परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणी अद्यापही कुणाला अटक झाली नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मास्टर माईंड वाल्मीक कराड हाच या हत्येमागे असल्याचा आरोप केला जात आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वारंवार तपासासाठी पोलिसांकडे पाठपुरावा केला पण पोलिसांचा तपास ठप्प झाला होता. आज त्यांनी आपल्या कुटुंबासह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. सकाळी त्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आपल्या आई-वडील आणि मुलांसह दाखल झाल्या. त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. महिला पोलिसांसोबत त्यांची झटापटही झाली. ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या हातातील पेट्रोलच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या म्हणून पुढचा अनर्थ टळला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

बाळा बांगरनेही दिला होता जबाब

संतोष देशमुख हत्याकांडातील मास्टर माईंड वाल्मीक कराड यांचा एकेकाळचा विश्वासू बाळा बांगर याने महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये पत्रकार परिषद घेवून गंभीर आरोप केले होते. वाल्मीक कराड याच्या टेबलवर महादेव मुंडे यांच्या मृतदेहाचे अवयव आणि मास आणून ठेवले होते असे त्यांनी म्हटले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा जबाबही घेतला होता. मात्र या प्रकरणी पोलिसांनी अद्यापपर्यंत ठोस पावले न उचलल्याने ज्ञानेश्वरी मुंडे संतप्त झाल्या आहेत.