
उदगीर तालूक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे बोरगाव व धडकनाळ या दोन गावातील वीजयंत्रणेला मोठा फटका बसला आहे. वीजतारा, पोलसह रोहित्रे कोसळून दोन्ही गावांचा वीजपुरवठा काल रात्रीपासून खंडीत झाला आहे. महावितरणच्या विभागीय कार्यालयाने याची त्वरीत दखल घेत भरपावसात वीजयंत्रणा पुर्ववत सुरू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे बोरगाव व धडकनाळ गावपरिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. आलेल्या पुरसदृश्य परिस्थितीमुळे बोरगाव व धडकनाळ गावांना वीजपुरवठा करणारे सात रोहित्रे, उच्चदाबाचे ४० पोल तर लघूदाब वीजवाहिनीचे ७० ते ८० पोल कोसळून जमीनदोस्त झाले आहेत. परिणामी या दोन्ही गावातील ३०० वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले तसेच लातूर मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी यांनी तातडीने वीजयंत्रणा उभी करून व शक्य असेल तिथे पर्यायी यंत्रणा वापरून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश उदगीर विभागाचे व ग्रामीण विभागाचे अधिकारी यांना दिले. कार्यकारी अभियंता रविंद्र महाव्दार व ग्रामीणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री बाहेती यांनी तात्काळ जनमित्र व देखभाल दुरूस्तीकरणाऱ्या एजन्सीना पाचारण करून वीजयंत्रणा उभी करण्याचे काम संरू केलेले आहे. सतत पाऊस सुरू असलातरी भरपावसात महावितरणची यंत्रणा कामाला लागली असून किमान गावातील वीजपुरवठा तत्काळ सुरू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.