खराब हवामानाची स्थिती कळणार कशी? राज्यातील काही विमानतळांवर हवामान खात्याच्या यंत्रणेचा अभाव

Lack of Weather Monitoring Systems at Maharashtra Airports Safety Concerns

विमानांचे धावपट्टीवर सुरक्षित लॅण्डिंग होण्यासाठी वैमानिकाला हवामाची स्थिती कळणे आवश्यक असते. मात्र राज्यातील काही विमानतळांवर अद्याप हवामान खात्याच्या यंत्रणेचा अभाव आहे. त्यामुळे हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) कक्षाला हवामानाच्या सद्यस्थितीचा अहवाल वेळीच प्राप्त करणे मुश्किल बनत आहे. खराब हवामानाची स्थिती वैमानिकाला आधीच कळत नसल्यामुळे काही विमानतळांवर अपघातांची धाकधूक कायम आहे.

विमानतळाच्या लॅण्डिंगपूर्वी वैमानिकाला हवामानाबाबत संदेश दिला जातो. हा संदेश देण्यासाठी एटीसी हवामान खात्याच्या यंत्रणेची मदत घेते. परंतु, काही विमानतळावर हवामान खात्याच्या यंत्रणेचा अभाव असल्याचे समजते. महाराष्ट्रात 25 हून अधिक छोटे-मोठे विमानतळ आहेत. त्यापैकी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासह पुणे, नांदेड, शिर्डी, सिंधुदुर्ग, जळगाव, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर अशा मोजक्या विमानतळांवर भारतीय हवामानशास्त्र विभागाची (आयएमडी) यंत्रणा कार्यरत आहे. बारामती विमानतळावर हवामानशास्त्र विभागाची यंत्रणा नाही. तसेच नाशिक, लोहेगाव यांसारख्या विमानतळांवर एअर फोर्सची यंत्रणा आहे. अलीकडच्या काही वर्षांत खराब हवामानामुळे विमान वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा स्थितीत प्रत्येक विमानतळावर हवामान खात्याची यंत्रणा कार्यान्वित करणे आणि त्या केंद्रावर पुरेशा हवामान तज्ज्ञांची नियुक्ती करणे आवश्यक आहे, असे मत हवाई वाहतूक क्षेत्रातील जाणकार व्यक्त करतात. संभाव्य अपघात रोखण्यासाठी विमानतळांवर हवामान खात्याची यंत्रणा मजबूत करण्याची मागणी जोर धरत आहे.

बारामती विमानतळावर ‘आयएलएस’ प्रणाली नव्हती!

कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत वैमानिकाला मार्गदर्शन करण्यासाठी विमानतळावर इन्स्टमेंट लॅण्डिंग सिस्टम (आयएलएस) असणे आवश्यक आहे. बारामती विमानतळावर या प्रणालीचा अभाव आहे. ही प्रणाली बारामती विमानतळावर असती तर बुधवारचा विमान अपघात टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया हवाई क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे. धावपट्टीवर ‘आयएलएस’ व हवामानाची माहिती देणाऱ्या इतर यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यकच असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.