अर्शिन-पृथ्वीची त्रिशतकी विक्रमी सलामी! महाराष्ट्राचा पहिला डाव 3 बाद 465 धावांवर घोषित, मुंबईच्या स्टार गोलंदाजांना अपयश

यजमान महाराष्ट्राने स्टार गोलंदाजांनी सजलेल्या मुंबईची गोलंदाजी निष्प्रभ ठरवत तीनदिवसीय सराव सामन्यातील पहिला दिवस गाजविला. अर्शिन कुलकर्णी व पृथ्वी शॉ या महाराष्ट्राच्या सलामीच्या जोडीने दणकेबाज दीडशतके ठोकून 305 धावांची विक्रमी सलामी देत मुंबईची स्टार गोलंदाजी निष्प्रभ ठरविली. महाराष्ट्राने 81 षटकांत 465 धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला. प्रत्युत्तरादाखल मुंबईने उर्वरित सात षटकांच्या खेळात 1 बाद 23 धावसंख्येपर्यंत मजल मारली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अंगक्रिश रघुवंशी 3, तर अखिल हेरवाडकर 12 धावांवर खेळत होते.

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मंगळवारपासून हा सराव सामना सुरू झाला. अर्शिन कुलकर्णीने केवळ 140 चेंडूंमध्ये 33 सणसणीत चौकार व चार टोलेजंग षटकार ठोकत 186 धावांची आतषबाजी केली. मुंबईने हकालपट्टी केलेल्या पृथ्वी शॉने महाराष्ट्राकडून खेळताना 220 चेंडूंत 21 चौकार व तीन षटकारांसह 181 धावांची प्रभावी खेळी करीत जुन्या संघाला आपले नाणे खणखणीत वाजवून दाखविले. याचबरोबर सिद्धेश वीरनेही 80 चेंडूंमध्ये सात चौकार व दोन षटकारांसह 60 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या तिघांच्या फलंदाजीमुळे महाराष्ट्राने सामन्यात भक्कम पकड निर्माण केली. सौरभ नवले 25, तर हर्षल खडीवाले 10 धावांवर नाबाद राहिले. मुंबईकडून मुशीर खानने दोन बळी घेतले, तर शम्स मुलाणीने एक गडी बाद केला.  महाराष्ट्राच्या फलंदाजांनी दाखविलेली काwशल्यपूर्ण आणि आक्रमक फलंदाजी त्यांच्या आगामी हंगामातील तयारीचे द्योतक ठरली. अर्शिन आणि पृथ्वी या सलामीच्या जोडीने क्लासिक आणि पॉवरफुल शॉट्सची सरमिसळ सादर करीत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.

महाराष्ट्राच्या 465 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना मुंबई संघाने 7 षटकांत एक गडी गमावून 23 धावा केल्या. मुशीर खानचा मुपुंद चौधरीने तिसऱ्याच षटकात स्वस्तातच बळी घेतला. अवघ्या 4 धावांवर यष्टीमागे सौरभ नवलेने त्याचा झेल टिपला. आता बुधवारी दुसऱ्या दिवशी मुंबईकडून महाराष्ट्राच्या डोंगराएवढय़ा धावसंख्येला कसे प्रत्युत्तर मिळते यावरून सामन्यावर कोणाचे वर्चस्व राहणार, हे ठरणार आहे.