बंडखोरी… मतविभाजनामुळे भाजपला फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुती राज्यात 200चा आकडा पार करेल अशी आम्हाला अपेक्षा होती; परंतु राज्यात काही ठिकाणी झालेली बंडखोरी रोखण्यात आम्ही अपयशी ठरलो. त्यामुळे झालेल्या मतविभाजनाचा फटका महायुतीला बसल्याचे भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले.  महायुतीत झालेल्या बंडखोरीमुळे महायुतीला दोनशे जागांचा टप्पा ओलांडता आला नाही. तरीदेखील 162 जागा आम्हाला मिळाल्या आहेत. तसेच ज्या काही 27-28 जागा अन्य आहेत त्यातील 15 अपक्ष आमच्या संपर्कात आहेत. बहुमतासाठी आवश्यक 145 जागांपेक्षा अधिक जागा शिवसेना-भाजपाकडे आहेत. त्यामुळे राज्यात महायुतीच सत्ता स्थापन करेल, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला आहे.

मागील 15 वर्षे या राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते तर मागील पाच वर्षे महायुतीचे सरकार होते. या दोन्ही सरकारांची तुलना केली तर 15 वर्षे कारभार करूनदेखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्या वेळेस नाकारले. महायुतीच्या सरकारमध्ये गेल्या पाच वर्षांत राज्यात जी विकासकामे झाली, शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे काही निर्णय घेतले त्यामुळे  जनतेने आम्हाला पुन्हा संधी दिली असल्याचे दानवे माध्यमांशी बोलताना म्हणाले.