भाजपमधून हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर आता दौंडमधील अजित पवार गटाचे नेते रमेश थोरात यांनीदेखील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर बैठका सुरू केल्या आहेत, तर जुन्नरमधील आमदार अतुल बेनके हेदेखील शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. बेनके यांनी स्वतः किंवा आपल्या आईला त्यांच्या पक्षातून उमेदवारी मिळण्याचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दौंडमधून अजित पवार यांचे कट्टर समर्थक रमेश थोरात विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून त्यांनी गेल्या आठवड्याभरात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबरोबर चर्चा केली. लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे संकेत देण्यात आले. शरद पवार यांच्याकडून निरोपाची वाट ते पाहात आहेत.
जुन्नर विधानसभा मतदारसंघात आमदार अतुल बेनके यांच्या राजकीय भूमिकेविषयी कमालीचा संभ्रम आहे. अतुल बेनके हे अनेकदा शरद पवार यांना भेटले. मात्र, त्यांच्याबद्दल शरद पवार यांच्याकडून सकारात्मक निर्णय येत नसल्याने त्यांनी आपल्या मातोश्रींना शरद पवार यांच्या पक्षाकडून उभे करण्याची तयारी दाखवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या तरी अतुल बेनके यांची भूमिका तळ्यात मळ्यात आहे. या सर्व घडामोडींवर ते अजित पवार यांची साथ ठेवणार की सोडणार याबद्दल त्यांनी भूमिका जाहीर केलेली नाही, तर दुसरीकडे विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे काँग्रेस पक्षात आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा विचार होऊ शकत नाही, असे शरद पवार यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.
निष्ठावंतांची नाराजी डोकेदुखी ठरणार!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये भाजप आणि अजित पवार यांच्या गटातील नेत्यांना मुक्तहस्ते प्रवेश दिला जात असल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये अत्यंत निष्ठेने काम करणारे नेते आणि कार्यकर्ते मात्र कमालीचे अस्वस्थ आहेत. या उमेदवारांमुळे ते आता उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. इंदापूरनंतर आता दौंड आणि जुन्नर तालुक्यातही या नाराजीला तोंड फुटले आहेत.