विधानसभा निवडणूक- आजपासून होणार उमेदवारी अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. यासंदर्भात शुक्रवारीच अधिसूचना जारी होणार असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत 4 ऑक्टोबर आहे. शुक्रवारपासून अर्ज भरण्याची तारीख असली तरी पितृपक्ष सुरू असल्याने सोमवारपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यास वेग येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने 21 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार शुक्रवारी निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत इच्छुक उमेदवारांना अर्ज घेऊन तो भरता येईल. येत्या शनिवार आणि रविवारी म्हणजे 28, 29 सप्टेंबरला  तसेच 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असल्याने या दिवशी उमेदवारी अर्ज मिळणार नाहीत तसेच स्वीकारण्यातही येणार नाहीत.

अर्ज भरण्यासाठी नवरात्रीचा मुहूर्त

पितृपंधरवडा सुरू आहे. रविवार, 29 सप्टेंबर रोजी नवरात्रीची घटस्थापना आहे. त्यामुळे नवरात्रीचा मुहूर्त साधत 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2019 या दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होईल. 4 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.