
सामना ऑनलाईन, मुंबई
नरेंद्र मोदी यांनी देशात निवडणुका एकत्रित घ्याव्यात असं मत मांडल्यानंतर केंद्रात भाजपच्या नेत्यांनी आग्रहीपणे हे व्हायलाच पाहीजे असं म्हणायला सुरूवात केली. इकडे महाराष्ट्रात मात्र भाजपच्या नेत्यांनी या विचारावर कुरकुर करायला सुरुवात केली आहे सध्याच्या घडीला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित न लढवणं हे भाजपसाठी फायद्याचं असल्याचं महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी म्हटलं आहे.
जर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घ्यायच्या ठरवल्या तर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका वेळेआधीच घ्याव्या लागतील. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत भाजपच्या एका मंत्र्याचं मत जाणून घेतलं. या मंत्र्याने म्हटलंय की यामध्ये (एकत्रित निवडणुका घेण्यात) काहीच अर्थ नाहीये. भाजपकडे सध्या सगळी ‘संसाधने’ मुबलक प्रमाणात आहेत तर विरोधक पुरेशी ‘संसाधने’ नसल्यामुळे हतबल झाले आहेत. जर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या घेतल्या तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्यांच्याकडील ‘संसाधने’ दोन निवडणुकांसाठी विभागून द्यावी लागतील ज्यामुळे ती आणखी तोकडी होतील. त्यामुळे दोन्ही निवडणुका वेगळ्या लढल्या गेल्या पाहीजेत.
भाजपच्या एका नेत्याला या प्रस्तावानंतर १९९९ सालची आठवण झाली. मुदतीआधी निवडणुका घेतल्याने त्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा झाला. केंद्रात भाजपप्रणित आघाडीचं सरकार आलं मात्र राज्यात युतीचा पराभव झाला. तेव्हा सहा महिने आधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळाली होती याची आठवण करून देत ही चूक पुन्हा करणं योग्य नसल्याचं या भाजप नेत्याने म्हटलंय.






















































