महाराष्ट्रावर जबर आघात! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन!! तडफदार आणि झंझावाती नेतृत्व काळाच्या पडद्याआड

महाराष्ट्रासाठी आजची सकाळ धक्कादायक ठरली. राज्यावर जबर आघात झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमध्ये भीषण विमान अपघातात निधन झाले. या बातमीने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. सर्वत्र शोकलहर निर्माण झाली…कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांच्याच अश्रूंचा बांध फुटला. राज्याच्या राजकारणातील ‘दादा माणूस’ अशी ओळख असलेले तडफदार आणि झंझावाती नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले… दादापर्व संपले. ही केवळ एका पक्षाची वा कुटुंबाची नाही, तर संपूर्ण राज्याची अपरिमित हानी आहे. ग्रामीण विकासाचा दूत, हाकेला धावणारा दिलदार आणि दमदार दादा आम्ही गमावला, अशी हळहळ सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळावर लँडिंग होत असताना शेतात कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की, आगीच्या ज्वाळांमध्ये संपूर्ण विमान जळून खाक झाले. अजितदादा यांना घेऊन जाणारे हे विमान मुंबईहून सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी निघाले होते, तर बारामती येथे 8.50 वा. पोहोचले. लँडिंग करत असतानाच या विमानाचा अपघात झाला. धावपट्टीवर उतरण्याऐवजी विमान जवळच्या शेतात कोसळले. विमानला आग लागून ते जळून खाक झाले. अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट पसरले. यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीती पसरली. प्रशासन, आपत्कालीन सेवांनी तात्काळ धाव घेतली. या दुर्घघटनेमुळे पवार कुटुंब, बारामतीकर आणि संबंध राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवर यांच्या निधनाची वार्ता समजताच अजितदादांवर प्रेम करणाऱ्या राज्यभरातल्या कार्यकर्त्यांनी बारामतीकडे धाव घेतली बारामतीतल्या व्यापाऱ्यांनी दुकाने तात्काळ बंद केली. अजितदादांना दाखल असलेल्या रुग्णालयाकडे हजारो कार्यकर्ते आणि शहरवासीयांनी धाव घेतली.

पवार कुटुंब शोकाकुल

अजितदादांच्या अपघाती दुर्दैवी मृत्यूने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ज्येष्ठ नेते शरद पवार मुंबईत होते. अपघाताचे वृत्त समजताच शरद पवार, प्रतिभाताई पवार बारामतीत दाखल झाले. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अजितदादांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, पुत्र पार्थ पवार, खासदार सुप्रिया सुळे दिल्लीत होते. ते विशेष विमानाने बारामतीत दाखल झाले. राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार, जय पवार, युगेंद्र पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीय, नातेवाईक, आप्तेष्ट यांना शोक अनावर झाला.

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी घेतले अंत्यदर्शन

अजितदादांचे पार्थिव बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. राज्यपाल देवव्रत आचार्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, हसन मुश्रीफ, भरत गोगावले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, शशिकांत शिंदे, धनंजय मुंडे यांच्यासह विविध पक्षांचे नेते, हजारो कार्यकर्ते, नागरिक यांनी अंत्यदर्शन घेतले.

बारामती झाली सुन्न

उपमुख्यमंत्री अजित पवार अपघाती निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण बारामती शहर, तालुका शोकसागरात बुडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. जणू आपल्या कुटुंबातीलच एखादा सदस्य, मोठा भाऊच हरपल्याची भावना प्रत्येक बारामतीकरांच्या मनात दाटून आली होती. शहरासह तालुक्यात सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. नेहमी गजबजलेले रस्ते, चौक आणि बाजारपेठा स्तब्ध झाल्यासारख्या भासत होत्या. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ केवळ जनतेसाठी झटणारा, विकासाला गती देणारा नेता आता आपल्यात नाही, हे पचवणे अत्यंत जड जात असल्याची स्थिती बारामतीकरांची निर्माण झाली होती.

आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या 29 जानेवारी रोजी बारामती येथे सकाळी 11 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात अंत्यदर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत काठेवाडी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सकाळी 9 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघेल. गदिमा चौक, विद्यानगरी चौक, विद्या प्रतिष्ठानचा अंतर्गत रस्ता, मराठी शाळेच्या गेटने विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर जाईल. तिथेच अंत्यसंस्कार होतील.

असा झाला अपघात

  • मुंबईहून बारामतीसाठी सकाळी 8.10 वाजता विमानाचे उड्डाण.
  • बारामती परिसरात दाट धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी होती.
  • विमानतळ लहान आहे. इन्स्टमेंट लँडिंग सिस्टम सुविधा नाहीत.
  • पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली.
  • विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला.
  • पहिला लँडिंगचा प्रयत्न रद्द. धुक्यात रनवेवर अलायन करणे कठीण.
  • दुसरा लँडिंगचा प्रयत्न, या वेळी पायलटने मेडे कॉल जारी केला.
  • डीजीसीएच्या माहितीनुसार, हा टेबल-टॉप रनवे आहे. विमान रनवेच्या कडेला कोसळले.
  • जवळपास 100 फूट उंचीवरून विमानाचा तोल गेला. रनवेपर्यंत पोहोचण्याआधी विमान सकाळी 8.50 वाजता जमिनीवर आदळले. विमान आदळल्यानंतर मोठा स्फोट झाला. त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले. स्फोटानंतर विमानाला भीषण आग लागली.

अपघाताच्या चौकशीचे आदेश

या विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. ही चौकशी डीजीसीए आणि एएआयबीद्वारे केली जाईल, असे डीजीसीएचे प्रमुख फैझ अहमद किडवई यांनी म्हटले आहे. घटनास्थळी विमानाचे अवशेष आणि ब्लॅक बॉक्स शोधण्यात येत आहे. या अपघाताचा प्राथमिक अहवाल पुढील काही दिवसांत येऊ शकतो. तसेच गरज पडल्यास या प्रकरणी विमान निर्माता कंपनी बम्बार्डिअर आणि इंजिन तज्ञांची मदत घेतली जाणार आहे. विमानाच्या फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरची तपासणी केली जाईल. विमानाच्या मेंटेनन्स लॉग, तांत्रिक स्थिती आणि पूर्व इतिहास, हवामान परिस्थिती, पायलट कम्युनिकेशन, एटीएस रेकॉर्डस् आणि लँडिंग अप्रोचबाबत डीजीसीएच्या चौकशीत फोकस राहील.

स्पह्ट, दोन तुकडे, आगीचा लोळ

अपघात एवढा भीषण होता की, विमानाचे दोन तुकडे झाले आणि मोठा स्पह्ट होऊन आग लागली. विमान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. विमान कोसळल्यानंतर पहिल्यांदा स्थानिक महिला, पुरुष धावून आले. पोलीस, अग्निशमन कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

मेडे कॉल, एअर ट्रफिक कंट्रोलशी संपर्क

पायलटने 8.18 च्या सुमारास बारामती एअर ट्रफिक कंट्रोलशी संपर्क केल्याची नोंद आहे. मात्र, त्यानंतर संपर्क होऊ शकलेला नाही. तसेच अपघातावेळी पायलटकडून ‘मेडे’ कॉल केला जातो. हा कॉल केला गेला की नाही याबाबत स्पष्टता झालेली नाही. चौकशीनंतरच ही बाब समोर येणार आहे.

तीन दिवस शासकीय दुखवटा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात 28 ते 30 जानेवारी 2026 या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

कार्यकर्त्यांपासून नेतेही ढसढसा रडले

अजित पवार यांच्या अकाली निधनाचा मोठा धक्का त्यांचे कार्यकर्ते व पक्षाच्या नेत्यांना बसला. निधनाची बातमी येताच हजारो कार्यकर्ते व नेते बारामतीच्या दिशेने निघाले. अजित पवारांचे पार्थिव जिथे ठेवले होते, त्या हॉस्पिटलच्या बाहेर मोठी गर्दी झाली होती. कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. पवार कुटुंबातील व्यक्ती दिसताच कार्यकर्ते धाय मोकलून रडत होते. नेत्यांच्याही अश्रूंचा बांध फुटला. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल देशमुख, विक्रम काळे, बाबासाहेब पाटील, नीलेश लंके या सर्वांनाच अश्रू अनावर झाले.

आमचा सच्चा आणि शिस्तप्रिय नेता गेल्याचे अतीव दुःख आहे. ज्यांच्या जिवावर आम्ही राजकारण केलं, तेच आम्हाला सोडून गेले. आता आम्ही सगळे पोरके झाल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले. अजितदादा हे कार्यकर्त्यांना जपणारे नेते होते. कडक शिस्तीचे दादा प्रसंगी कार्यकर्त्यांना सर्वांसमोर झापायचे. मात्र अडचणीच्या वेळी दादाच आपल्या मागे उभे राहतील हा विश्वास प्रत्येक कार्यकर्त्याला होता. अजित पवारांनी अनेक तरुण नेत्यांना पक्षात संधी दिली. त्यात धनंजय मुंडे, अमोल मिटकरी, नीलेश लंके यांच्यासारखे अनेक नेते होते.

घडय़ाळामुळे ओळख पटली

अपघात एवढा भीषण होता की, अजितदादांसह पाचजणांची ओळख पटणे कठीण होते. मात्र, अजितदादांच्या हातावरील घडय़ाळ आणि गॉगलमुळे त्यांची ओळख पटली. अजित पवारांच्या पक्षाचे चिन्ह घडय़ाळ आहे. शेवटपर्यंत घड्याळाने त्यांना साथ दिली. पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अजितदादा आणि इतर चारजणांचे मृतदेह रुग्णवाहिकेने बारामती येथील रुग्णालयात दाखल केले.

व्हीएसआर व्हेंचर्सने जबाबदारी झटकली

विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या विमान कंपनीची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. मात्र, व्हीएसआर व्हेंचर्सचे चेअरमन व्ही. के. सिंग यांनी जबाबदारी झटकली. विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. पायलटला 16 हजार तास आणि को-पायलटला 1500 तास विमान उड्डाणाचा अनुभव होता, असे त्यांनी म्हटले आहे. या कंपनीकडून सात लिअरजेट विमाने चालविली जातात. अपघातानंतर उर्वरित उड्डाणे थांबविण्याचा विचार आहे का, असे विचारले असता सिंग यांनी नकार दिला. मी विमान उड्डाणे का थांबवू, ती सर्व फिट आहेत, असे उत्तर त्यांनी दिले. दरम्यान, विमान अपघात तपास ब्युरोचे पथक दिल्लीतील व्हीएसआर व्हेंचर्सच्या कार्यालयात धडकले, तर दुसरे पथक बारामतीत पोहचले आहे.

हा अपघातच… राजकारण नको; शरद पवारांना अश्रू अनावर

अजित पवार यांच्या निधनाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अजितदादांवर बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. एक कर्तृत्ववान नेता हरपला. महाराष्ट्राचे कधीही भरून निघणार नाही असे नुकसान झाले. हा मोठा धक्का आहे, असे ते म्हणाले. अपघाताबाबत अनेक बातम्या येत होत्या. त्यावरही ते बोलले. ‘हा निव्वळ अपघात आहे. यात राजकारण नाही. कुणीही या घटनेचे राजकारण करू नये, असे त्यांनी सांगितले.

मित्र गमावला

जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादांना श्रद्धांजली अर्पण केली. ते पुढे म्हणाले की, माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही मोठी वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे, असे फडणवीस म्हणाले.