महाराष्ट्राला सुवर्णसंधी, जेतेपदाचा अंतिम संघर्ष बलाढ्य हिंदुस्थानी रेल्वेशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राने 72व्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पुन्हा एकदा आपला दम घुमवला. चार वर्षांनंतर अंतिम फेरी गाठत महाराष्ट्राने विजेतेपदावर नाव कोरण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवलेय. आता जेतेपदासाठी त्यांच्यासमोर उभा ठाकणार आहे कट्टर प्रतिस्पर्धी हिंदुस्थानी रेल्वेचा बलाढय़ संघ.

सागा बंदिस्त क्रीडा संपुलात रंगलेल्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशचे कडवे आव्हान 49-36 असे परतवून लावत अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले. सुरुवातीलाच लोण देत 12-7 अशी आघाडी घेत महाराष्ट्राने आपला इरादा स्पष्ट केला. मध्यंतराला 28-22 अशी आघाडी राखत ‘आम्हीच जिंकणार’ हा इशाराही दिला. विश्रांतीनंतर कधी शांत, तर कधी आक्रमक खेळ करत महाराष्ट्राने आपली पकड ढिली होऊ दिली नाही. अखेरच्या पाच मिनिटांत आघाडी दहापर्यंत नेत त्यांनी आपला विजय निश्चित केला होता. अस्लम इनामदार, आदित्य शिंदे आणि शुभम पाठरे यांनी महाराष्ट्राचा अंतिम फेरीचा मार्ग पहिल्या सत्रातच सुकर केला.

दुसऱया उपांत्य लढतीत हिंदुस्थानी रेल्वे आणि चंदीगड यांच्यात थरार रंगला. 38-38 अशा बरोबरीनंतर पाच-पाच चढायांच्या निर्णायक टप्प्यात रेल्वेने 7-4 अशी बाजी मारत अंतिम फेरी गाठली. 2019नंतर रेल्वे, सेनादल आणि हरियाणा या संघांचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र महाराष्ट्राला आता ते वर्चस्व मोडून काढण्याची संधी आहे. 2018मध्ये रिशांक देवाडिगाच्या नेतृत्वाखाली 11 वर्षांचा दुष्काळ संपवला होता. आता पुन्हा एकदा आठ वर्षांनंतर जेतेपदाचा मुपुट डोक्यावर चढवण्याची त्यांना नामी संधी लाभलीय.