
उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट आल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातही थंडीचे आगमन झाले आहे. 12 ते 15 नोव्हेंबरदरम्यान जम्मू कश्मीरमध्ये हिमवृष्टी होण्याची शक्यता असून, उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट वाढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही आठवडाभरात गारठा वाढून थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात थंडी वाढत असल्याने मुंबई, ठाणे आणि परिसरातही गारवा पसरला आहे.
पुण्यात सलग दुसर्या दिवशी थंडीत वाढ दिसून आली. पुण्यात बुधवारी पारा 10.6 अंशापर्यंत खाली आला आहे. सरासरीपेक्षा 4.7 अंशांनी पारा घसरला आहे. राज्यात परभणीत सर्वात कमी 9.9 अंश तापमान नोंदवण्यात आले. तर पुणे थंड शहरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडामध्ये थंडीची लाट आल्यासारखी स्थिती असल्याचे पुण्यातील हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सरासरी तापमानात 4.5 अंशापेक्षा जास्त घसरण होते आणि सलग चार दिवसांपेक्षा जास्तकाळ थंडी नोंदवण्यात येऊन तापमानात घट होते, तेव्हा थंडीची लाट असल्याचे जाहीर करण्यात येते. आता सरासरी तापमानात 4.5 अंशापेक्षा जास्त घट झाली असून सलग दोन दिवस थंडी नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात थंडीच्या लाटेसारखे वातावरण असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बुधवारी रात्रीचे तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअसदरम्यान होते. सरासरी तापमानापेक्षा 4 ते 5 अंशानी पारा घसरला आहे. गोंदियामध्ये 11.4 अंश सेल्सियस, जळगावमध्ये11.6 अंश सेल्सियस, चंद्रपूरमध्ये 11.8 अंश सेल्सियस), संभाजीनगरमध्ये 12 अंश सेल्सियस आणि महाबळेश्वरमध्ये 12.2 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. तसेच राज्यातल्या अनेक भागात तापमानात घट झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट आहे. उत्तरेतील या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रातही थंडीचे आगमन झाले असून थंडीच्या लोटेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आठवड्याभरात उत्तरेत थंडीची कडाका वाढणार आहे. तसेच 12 ते 15 नोव्हेंबरदरम्यान जम्मू कश्मीरमध्ये हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर हिंदुस्थानातील या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 15 नोव्हेंपर्यंत राज्यात गारठा राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र, 16 नोव्हेंबरनंतर पारा सरासरी अंशांवर स्थिरावेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.






























































