
उन्हाळ्याची तीव्रता वाढताच राज्यातल्या धरणांतील पाण्याची पातळीही खालावत चालली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांतच राज्यातल्या सुमारे तीन हजार मोठ्या आणि मध्यम आकाराच्या धरणांतील पाणीसाठा 52.71 टक्क्यांवर आला आहे. पुढील काही दिवसांत उष्णतेच्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यांत महाराष्ट्रावर भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण होण्याची चिन्हे आहेत, पण या पाणीटंचाईमुळे टँकरमाफियांचे फावणार अशी परिस्थिती आहे.
राज्यात गेल्या वर्षीही धरणांतील पाणीसाठा खाली आला होता. सुदैवाने पाऊस चांगला झाल्यामुळे धरणे भरली होती. त्यामुळे वर्षभर तरी पाण्याची चिंता भेडसावणार नाही अशी जलसंपदा विभागाची अटकळ होती, पण मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांतच धरणातील पाणीसाठा निम्म्यावर आल्याचे दिसून आले आहे.
राज्यातील धरणांचा 15 मार्चपर्यंत पाणीसाठा
कोयना – 63.64 टक्के
तिलारी – 44.23 टक्के
गंगापूर – 71.42 टक्के
जायकवाडी – 62.17 टक्के
राधानगरी – 65.07 टक्के
पानशेत – 55.08 टक्के
खडकवासला – 70.01 टक्के
विभागांतील पाणीसाठा
नागपूर – 48.83 टक्के
अमरावती – 57.39 टक्के
नाशिक – 52.89 टक्के
पुणे – 52.22 टक्के
कोकण – 57.63 टक्के
छत्रपती संभाजीनगर – 51.11 टक्के
मागील वर्षीचा साठा (15 मार्च 2024) – 43.45 टक्के
राज्यातील काही प्रमुख धरणांतील पाणीसाठा
एकूण धरणे – 2 हजार 997
पाणीसाठा – 52.71 टक्के
मुंबईची मदार ‘राखीव कोट्या’वर
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात धरणांमध्ये सध्या 609740 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पालिका राज्य सरकारकडे अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातून राखीव पाणी देण्याची मागणी करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव जल विभागाकडून आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. यामध्ये वैतरणातून 68 हजार दशलक्ष लिटर तर भातसामधून 1 लाख 13 हजार दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे.






























































