बाबुराव चांदेरेंची हकालपट्टी, राज्य कबड्डी संघटनेतील मनमानी संपुष्टात; कीर्तिकर अध्यक्ष तर गायकवाड सरकार्यवाह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वरदहस्तामुळे महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेत हम करे सो कायदा अशा आविर्भावात वावरत मनमानी कारभार करणाऱया बाबुराव चांदेरे यांची अखेर कबड्डी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता त्यांच्या जागी नाशिकच्या मोहन गायकवाड यांच्याकडे प्रभारी सरकार्यवाह पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून माजी खासदार गजानन कीर्तिकर हे प्रभारी अध्यक्षपद सांभाळतील. राज्य संघटनेच्या निवडणुकीला न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली असून ती स्थगिती लवकरच हटवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यानंतर नव्याने निवडणुका घेतल्या जातील.

गेली तीन वर्षे राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह म्हणून अजित पवार यांनी आपले निकटवर्तीय आणि हाडाचे कबड्डी संघटक असलेल्या बाबुराव चांदेरे यांच्याकडे सरकार्यवाहपदाची सूत्रे सोपवली होती. तेव्हापासून चांदेरे यांनी कबड्डीसाठी झटता झटता कोणालाही विश्वासात न घेता स्वतःची दादागिरी दाखवत आणि स्वतःच्या बाबुराव चांदेरे फाऊंडेशन या कबड्डी संघाला मजबूत करण्यासाठी त्यांनी अनेक जिह्यांच्या संघांना आणि खेळाडूंना फोडत अनेकांची नाराजी ओढवली. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या संघातील खेळाडूंना जिल्हा संघात स्थान मिळावे म्हणून महानगरपालिका असलेल्या जिह्यांचे दोन-दोन संघ करण्याचा अनोखा प्रकार केला होता.

राज्य कबड्डी संघटनेच्या मुख्यालयात रविवारी घेण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत चांदेरेंची मनमानी संपवताना त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्यांनी जिह्यांच्या वाढवलेल्या संघांचा निर्णय पूर्वीप्रमाणे एक जिल्हा एक संघ असा केला. त्यांच्या या निर्णयामुळे कबड्डीचा किती फायदा झाला त्याची कल्पना नाही, पण गेल्या वर्षभरात खेळलेल्या 14 राष्ट्रीय स्पर्धांपैकी केवळ तीन स्पर्धांत कांस्य पदक जिंकण्यात यश लाभले आहे. चांदेरेंच्या खेळाडूंच्या घुसवाघुसवीच्या निर्णयामुळे महाराष्ट्र संघांची वाताहत झाल्याचे आरोप करण्यात आले होते. आता त्यांच्या हकालपट्टीनंतर राज्य संघाला बळकटी देण्याचे आव्हान नव्या प्रभारींपुढे असेल.