
महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढा आंदोलनाच्या काळात मुंबईत बलिदान दिलेल्या 67 शिवसैनिकांना शहीदाचा दर्जा द्यावा, अशी मागणी सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
बेळगाव-कारवार संयुक्त महाराष्ट्र संघर्षात हौतात्म्य पत्करलेल्या वीर शिवसैनिकांना शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्या 67 शिवसैनिकांना शहीदाचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. 1 नोव्हेंबर 1968 रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सीमाबांधवांना पाठिंबा देण्यासाठी बेळगावला गेले होते. पुढील वर्षी सीमाबांधवांना काळा दिवस पाळावा लागणार नाही, असे आश्वस्त करत शिवसेनाप्रमुखांनी केंद्र सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता. सीमाप्रश्न तातडीने सोडवा अथवा केंद्रीय मंत्र्यांना मुंबईत फिरू देणार नाही, असेही त्यांनी बजावले होते. 8 फेब्रुवारी 1969 रोजी मुंबईत केंद्रीय मंत्री मोरारजी देसाई यांना निवेदन देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. त्यानुसार त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांच्या ताफ्यातील वाहनाने शिवसैनिकांना चिरडले. त्यामुळे सीमाप्रश्नी तीव्र आंदोलन सुरू झाले. या आंदोलनात 67 शिवसैनिक हुतात्मा झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी यांना अटक झाली. त्यानंतर सीमालढा अधिक तीव्र झाला याची आठवण शिंदे यांनी करून दिली आहे. कर्नाटक सरकार आजही सीमाभागातील मराठी बांधवांची गळचेपी करत असल्याचे शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.





























































