महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा  – बोडकेने जमदाडेला लोळविले, महेंद्र गायकवाडची विजयी सलामी; विशाल बनकर पराभूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘महाराष्ट्र केसरी’ महेंद्र गायकवाड आणि नव्या दमाचा मल्ल बाळू बोडके यांनी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेतील माती विभागातून विजयी सलामी देत गुरुवारचा दिवस गाजविला. महेंद्र गायकवाडने विशाल बनकरविरुद्ध बाजी मारत स्पर्धेत विजयारंभ केला. मात्र, नाशिकच्या बाळू बोडकेने कोल्हापूरचा अनुभवी मल्ल माउली जमदाडेवर सनसनाटी विजय मिळवित आपल्या ताकदीची झलक दाखविली.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व रामकृष्ण अण्णा सातव कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूरच्या बलदंड महेंद्र गायकवाडने अतिशय थरारक लढतीत सोलापूरच्याच विशाल बनकरचा कडवा प्रतिकार 6-1 गुणफरकाने मोडून काढत विजयी सलामी दिली. त्यानंतर कोल्हापूरच्या बलाढय़ माऊली जमदाडेने सलामीलाच निराशा केली. नाशिकच्या बाळू बोडकेने वाईल्ड कार्डने एण्ट्री मिळालेल्या या स्टार मल्लाचा 10-5 गुणफरकाने पराभव करून स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल नोंदविला. माऊलीला त्याच्या उंचीचा फायदा घेता आला नाही. बाळू बोडकेने ताकद आणि चपळाईचा अचूक संगम साधत माऊलीला धोबीपछाड दिला.

सिपंदर शेख, शिवराज राक्षेचे अभियान सुरू

माती विभागातील इतर लढतीत हिंगोलीकडून खेळणाऱया आणि वाईल्ड कार्डने स्पर्धेत एण्ट्री मिळालेल्या सिपंदर शेखने पुणे जिह्याच्या अनिकेत मांगडेवर 8-1 अशी सहज मात करीत आपल्या अभियानास प्रारंभ केला. गादी विभागातून पुणे जिह्याचा ‘महाराष्ट्र केसरी’ शिवराज राक्षेने पुणे शहरच्या प्रतीक जगतापवर 10-0 असे वर्चस्व गाजवित विजयी सलामी दिली, तर पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने जालन्याच्या अरुण चलावडेचा 10-0 गुणफरकाने धुव्वा उडविला.

मशीद शेख, चंद्रहार नरळे अंतिम फेरीत

त्याआधी, गुरुवारी सकाळच्या सत्रात हजारो कुस्तीशौकिनांच्या उपस्थितीत 57 व 86 किलो वजनी गटाच्या अत्यंत चुरशीच्या लढती रंगल्या. यामध्ये पदकांचे दावेदार असलेल्या काही मल्लांचे आव्हान संपुष्टात आले. माती विभागातील 86 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत सोलापूर शहरच्या मशीद शेखने सोलापूर जिह्याच्या जय जाधवला 10-0 गुणफरकाने धूळ चारली. पुणे शहरच्या चंद्रहार नरळे याने साताऱयाच्या विशाल कोकरेचा अनपेक्षितरीत्या 4-2 फरकाने पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली.

अक्षय ढेरे, शुभम आचपळे सुवर्ण पदकासमीप

गादी विभागातील 57 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत कोल्हापूर शहराचा राष्ट्रीय मल्ल अक्षय ढेरे याने अपेक्षेप्रमाणे कल्याणच्या विनायक भोईरची 13-2 अशी दाणादाण उडवित दिमाखात अंतिम फेरी गाठली. दुसऱया लढतीत नाशिक जिह्याच्या शुभम आचपळे याने साताऱयाच्या साहिल गोफणेचा 10-2 गुणफरकाने पराभव करीत अंतिम फेरी गाठली.

कोल्हापूरच्या मृणालला पदार्पणातच सुवर्ण

माती विभागातील 57 किलो गटाच्या अंतिम लढतीत कुस्तीची पंढरी असलेल्या कोल्हापूर जिह्याच्या मृणाल पाटीलने पुणे शहरच्या ओंकार निगडेला पराभूत करत पदार्पणातच सुवर्णपदक पटकाविण्याचा पराक्रम केला. ओंकारला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर कोल्हापूर शहरचा सुदर्शन पाटील कास्यपदकाचा मानकरी ठरला. त्याआधी, उपांत्य फेरीत पुण्याच्या ओंकार निगडेने कोल्हापूरच्या सुदर्शन पाटीलचा 7-0, तर कोल्हापूरच्या मृणाल पाटीलने सोलापूर जिह्याच्या अजय निंबाळकरवर 5-1 अशी मात करीत अंतिम फेरी गाठली होती.