लॉकडाऊनच्या काळात अडीच लाख गुन्हे; 25 कोटींची दंडवसुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आदेशांचे पालन न केल्याच्या आरोपाखाली कलम 188 नुसार आतापर्यंंत 2 लाख 55 हजार 756 गुन्हे दाखल करण्यात आले असून 3,48,00 लोकांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यासाठी आरोपींकडून 25,12,91,114 रुपये दंडवसुली करण्यात आली असल्याची अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, परिचारिका व आरोग्य कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. परंतु काही लोक त्यांच्यावरच हल्ले करीत असून अशा हल्लेखोरांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश आहेत. या कालावधीत पोलिसांवरच हल्ला केल्याच्या 356 घटना घडल्या. त्यात 884 व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांना 1 लाख 13 हजार कॉल

पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यांत 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर 1,13,032 कॉल आले. त्या सर्वांची योग्य ती दखलघेण्यात आली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1347 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर 96,149 वाहने जप्त करण्यात आली.

पोलीस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्दैवाने राज्यातील 184 पोलीस व 20 अधिकारी अशा एकूण 204 पोलीस कर्मचारी/अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. पोलिसांना कोरोनासंदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.