
अजित पवार यांच्या अचानक जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी भरून निघू शकत नाही. मला त्यांच्याशी अनेक वेळा बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी माझ्यावर केलेले प्रेम कधीही विसरता येणार नाही. पवार कुटुंब, त्यांचे प्रियजन आणि त्यांच्या लाखो समर्थकांप्रति माझ्या मनापासून संवेदना. – रितेश देशमुख, अभिनेता
मित्रांनो माझा देव चोरला आज. माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांधून दिलं, माझी काळजी घेतली… मला नवीन आयुष्य मिळवून दिलं. मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन. दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. – सूरज चव्हाण, बिग बॉस मराठी विजेता
देव कुटुंबासाठी हा अत्यंत हृदयद्रावक क्षण आहे. पवार कुटुंबातील सर्व सदस्यांना तसेच गेल्या काही काळापासून जवळचा मित्र असलेल्या पार्थ पवार यांना माझ्या मनापासून संवेदना. या अपार दुःखातून सावरण्याची ताकद देव त्यांना देवो. – अजिंक्य देव, अभिनेता
अजितदादा यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. हे महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. महाराष्ट्राच्या प्रशासनावर घट्ट पकड असलेला
अॅडमिनीस्ट्रेटर गेला! लोकांचं काम करणारा माणूस गेला. अलविदा दादा! – हेमंत ढोमे, अभिनेता-निर्माता
दादा… तुमचं असं जाणं मनाला चटका लावून गेलं. आज घरातील कुणीतरी गेलं असं वाटतंय. आम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला हे स्वीकारण्याची शक्ती देवो हीच ईश्वरी चरणी प्रार्थना. – सायली संजीव, अभिनेत्री
दादा, महाराष्ट्राच्या राजकारणात तुमचं स्थान वेगळं होतं. तुमचं साधेपण, काम करण्याची तळमळ, सामान्य माणसाशी संवाद साधण्याचं कसब खरोखरच दुर्मिळ होतं. तुमची ऊर्जा आणि व्यक्तिमत्त्व प्रेरणा देत राहील. – स्वप्नील जोशी, अभिनेता
दादा, तुमचा हजरजबाबीपणा, तुमची सर्वसामान्य माणसाशी थेट त्याच्या भाषेत संवाद साधण्याची पद्धत, छोटय़ा छोटय़ा गोष्टींमध्ये तुमचं असलेलं लक्ष… तुमची उणीव कायम भासत राहील दादा. तुमच्याशी झालेल्या भेटी कायम स्मरणात राहतील. तुम्ही कायम आठवत रहाल दादा. – सुबोध भावे, अभिनेता
अकाली निधन ऐकून धक्का बसला!
अजित पवार यांचे अकाली निधन झाल्याची बातमी ऐकून प्रचंड मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांना मी माझ्या काॅलेजच्या दिवसांपासून ओळखत होतो. अजित दादा यांची प्रशासनावर एक वेगळीच पकड होती. त्यांच्या जाण्याने ही पोकळी न भरून निघणारी अशीच आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. – ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री, जम्मू-कश्मीर
राज्याचे मोठे नुकसान झालेय!
मला आज सकाळी या दुःखद घटनेबद्दल समजले. ते जवळपास 20 वर्षे आमच्यासोबत काम करणारे आणि आमच्यासोबत राहिलेले सहकारी होते. त्यांना जे काही काम दिले गेले, ते त्यांनी मनापासून, विचारपूर्वक आणि पूर्ण निष्ठ:ने केले. हे एक मोठे नुकसान आहे, ज्याची भरपाई होऊ शकत नाही. मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. – सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र
मी माझा जवळचा मित्र गमवला
अजित पवार यांचे निधन अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. मी माझा जवळचा मित्र गमावला आहे. गेल्या 40 वर्षांपासून ते महाराष्ट्र राजकारणात माझे खूप जवळचे मित्र होते. माझे त्यांच्याशी काैटुंबिक संबंधही होते. त्यांचे जाणे ही एक मोठी हानी आहे. ० नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
आकस न ठेवता काम केले
अजित पवार यांच्यासोबत मी विरोधी पक्षनेता म्हणून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. त्यांच्यासोबत काम करताना आलेला अनुभव आयुष्यभर लक्षात राहील असा आहे. अजित पवार सत्तेत असताना, त्यांच्यावर टीका-टिपण्णी करूनही, त्यांच्याकडे कामानिमित्त गेल्यावर ते कधीही आकस न ठेवता जनतेचे काम मनापासून करायचे. – अंबादास दानवे, आमदार, शिवसेना नेते
राज्याने एक उमदा नेता गमावला
पुशल प्रशासक आणि कठोर निर्णय घेण्याची क्षमता असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्यात नाहीत, ही अत्यंत दुःखदायक घटना आहे. अनेक वर्षे आम्ही एकत्रित काम केले. त्यांच्या जाण्याने एक उमदा नेता आपण गमावलेला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. – बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते
उणीव कायम भासत राहील
राष्ट्रवादी परिवारातील आम्हा सर्व सहकाऱयांच्या आयुष्यातील आजचा दिवस सर्वात वाईट दिवस आहे. दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे जे नुकसान झाले आहे ते नुकसान कधीही भरून निघणार नाही. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक सर्वाधिक उत्तम प्रशासक व एक अत्यंत मोठा लोकनेता महाराष्ट्राने कायमचा गमावला आहे. अजितदादांची उणीव कायम भासत राहील. – जयंत पाटील, नेते, राष्ट्रवादी
वेळेत जाणारे चुकीच्या वेळी गेले
महाराष्ट्राच्या राजकारणात आता दादा नसतील ही जाणीवच अंगावर काटा आणणारी आहे. कामाचा प्रचंड आवाका आणि उरक असणारा हा लोकप्रिय लोकनेता नियतीने आज आपल्यापासून हिरावला. प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारे दादा आज चुकीच्या वेळी गेले…! अधिक लिहवत नाही. शब्द अपुरे आहेत आणि भावना गोठल्या आहेत. – जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी




























































