
मुंबई महानगरपालिकेसह राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये काढ झाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. बुधवारी राज्यात एकूण 14 हजार 888 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कमी होत चाललेल्या कोरोना रुग्णांची संख्या थेट 1 हजार 854 पोहचली. दरम्यान, बुधवारी 7 हजार 637 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून राज्यात कोरोनामुळे 295 जणांचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.
आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बुधवारी राज्यात एकूण 7 हजार 637 रुग्णे बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 5 लाख 22 हजार 427 रुग्णे कोरोनामुक्त झालेले आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.69 टक्के इतके नोंदविण्यात आला असून मृत्यू दर 3.21 टक्के इतका असल्याचे आज जाहीर करण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण 37 लाख 94 हजार 27 चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
मुंबईत दिवसभरात 1,854 कोरोना रुग्ण; बुधवारी 776 कोरोनामुक्त, 28 जणांचा मृत्यू
मुंबईत बुधवारी दिवसभरात 1854 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत 776 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 1 लाख 12,743 वर पोहोचली आहे. दरम्यान, बुधवारी मुंबईत दुसऱयांदा 28 इतक्या कमी मृत्यूंची नोंद झाली.
मुंबईत 28 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 7 हजार 502 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 93 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 18 हजार 977 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 7 लाख 25 हजार 519 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 39,532 वर पोहोचली आहे.
देशात 3 कोटी 76 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या, 24 तासांत 8 लाख
देशात दरदिवशी कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवले गेल्याने महाभयंकर विषाणूचा प्रसार रोखता आला, असा दावा बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) आकडेवारीनुसार, बुधवारी एका दिवसात 8 लाख 23 हजार 992 नमुने तपासण्यात आले. त्यामुळे एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 3 कोटी 76 लाख 51 हजार 512 झाली आहे.
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जानेवारीत दिवसाला एक चाचणी केली गेली होती. त्याचवेळी सरकारने कोरोनाच्या चाचण्यांची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली. त्यामुळे दर महिन्याला चाचण्यांची संख्या वाढत गेली आणि ऑगस्टमध्ये दिवसाला तब्बल दहा लाख कोरोना चाचण्या करण्याइतपत यंत्रणा सक्षम झाली आहे. एकीकडे कोरोनाच्या पॉझिटिव्ह रेटमध्ये लक्षणीय घट होत असतानाच चाचण्यांचे वाढीव प्रमाण विषाणूचा प्रसार रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने दुसऱया ट्विटद्वारे स्पष्ट केले.
























































