
महाराष्ट्रात पाऊस कोपला असून रविवारीही पावसाने थैमान घातले. पैठणच्या नाथसागरातून अडीच लाख क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदेकाठच्या जालना, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यांसाठी रात्र वैऱ्याची आहे. मराठवाड्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाल्याने शेकडो गावांमध्ये दवंड्या पिटून अलर्ट दिला आहे. नाशिकलाही अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. गोदाघाटावरील मंदिरे, दुकाने पाण्याखाली गेली आहेत. अहिल्यानगरमध्ये 32 गावे पुराच्या विळख्यात अडकली असून हेलिकॉप्टरच्या साहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवले गेले. अनेक जिल्हे पुराच्या महासंकटात सापडले आहेत. आणखी चार दिवस अतिवृष्टीचे व जलप्रकोपाचे असतील, असा हाय अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.
गेल्या आठवडाभरापासून अतिवृष्टीने महाराष्ट्रात हाहाकार उडवला आहे. विशेषतः मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशीव, परभणी या जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यात पुरामुळे जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे. पावसाचा जोर वाढताच असल्याने पुराच्या संकटाने राज्याची चिंता वाढवली आहे. परतीच्या पावसाने मागील दोन दिवसांत मराठवाड्याला अक्षरशः झोडपून काढले. रविवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील 84 पैकी 68 मंडळांत अतिवृष्टी झाली. पैठणच्या नाथसागरात मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडण्यात आले असून अडीच लाख क्युसेस वेगाने विसर्ग सुरू आहे. बीड जिल्ह्यातील प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने 62 गावांतील नागरिक स्थलांतराच्या तयारीत आहेत. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांतील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नाशिक जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यादरम्यान गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे.
शेवगावमधील 113 गावे जलमय; 80 जणांना वाचवले
अहिल्या नगरात शेवगाव तालुक्यातील 113 गावे जलमय झाली असून 60 हजार हेक्टरवरील पिके चिखलात सडली आहेत. शहरटाकळी देवटाकळी येथील मिरजे वाघमारे वस्तीला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. जवळपास 75 ते 80 रहिवासी अडकले होते. त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी एअर पर्ह्सचे हेलिकॉप्टर मागवले होते. मात्र, एसडीआरएफच्या जवानांनी व स्थानिक प्रशासनाने चप्पूंच्या साहाय्याने सर्वांना सुखरूप बाहेर काढले.
सीनेचे पाणी अहिल्यानगरात शिरले
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शनिवारी रात्री पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली आहे. सीना नदीला पूर आला असून, सीनेचे पाणी अहिल्यानगरात घुसले आहे. शहरातील नेप्ती नाका परिसरात पुराचे पाणी पसरल्याने पर्यायी मार्गाचा वापर सुरू आहे. नगर-कल्याण व नगर-मनमाड महामार्ग हा बंद करून दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. जिल्ह्यातही पावसाचे थैमान सुरू असून, अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील रस्ता वाहून गेला आहे, तर राहाता तालुक्यातील गावांमध्ये जाणारे रस्ते बंद झाले. शेवगाव आणि कर्जतमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल झाले, तर हेलिकॉप्टरच्या साहाय्याने अनेकांना सुखरूप बाहेर काढले जात आहे. दरम्यान, पाथर्डी व शेवगाव तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पडला आहे. अनेक तालुक्यांमध्ये अजूनही पाऊस सुरू आहे.
354 नागरिकांना वाचवले
मराठवाड्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 354 नागरिकांना सुखरूपरीत्या बाहेर काढले आणि त्यांना वाचवण्यात आले. ब्राह्मणी नदीत मदन राठोड (55) हा रहिवासी वाहून गेला. त्यांचा अद्याप थांगपत्ता लागला नाही.
कार नदीपात्रात कोसळून चालकाचा मृत्यू
चासकमान धरणातुन सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे भिमानदी वरील मोरीपुलावरुन चासकडे जाणाऱ्या वँगनर नदीपात्रात कोसळून चालकाचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर किसन काsंबल (वय 52) असे मरण पावलेल्या चालकाचे नाव आहे. ढुंढी विनायक मित्र मंडळाच्या युवकांनी ट्रँक्टर आणुन गाडीला दोर बांधून रात्री गाडी पाण्याबाहेर काढले.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला झोडपून काढले, नालासोपारा, वसईत सोसायट्या पाण्यात
धो-धो कोसळणाऱ्या पावसाने मुंबई, ठाणे शहरांना आज धडकी भरवली. रात्रभर विजांच्या कडकडाटासह पावसाने धुमशान घातले. दिवसभर जोर कायम होता. पालघर, रायगड जिल्ह्यांनाही पावसाने तडाखा दिला. नालासोपारा, वसई परिसरात अनेक सोसायटय़ांमध्ये पाणी भरले. पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल. ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.