
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या मतदार यादीत घोळ असून काही जणांना डावलल्याचा दावा करत हायकोर्टात विविध संघटनांनी याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीला स्थगिती द्या अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली, मात्र निवडणूक तोंडावर आली असून निवडणूक झाल्यावर दाद मागा असे स्पष्ट करत हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना याचिका मागे घेण्याची परवानगी दिली.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक 2 नोव्हेंबर रोजी होणार असून असोसिएशनने 6 ऑक्टोबर रोजी प्रकाशित केलेल्या मतदार प्रतिनिधींच्या नावाला आक्षेप घेत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याचबरोबर या निवडणूक प्रक्रियेला विरोध करत महाराष्ट्र स्टेट एक्वाटिक्स को-ऑर्डीनेशन कमिटी, महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशन, महाराष्ट्र अमेच्युअर अॅथलेटिक्स असोसिएशनने अॅड. अजिंक्य उदाने यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर आज मंगळवारी सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी अॅड. अजिंक्य उदाने यांनी न्यायालयाला सांगितले की, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणूक प्रक्रियेत अनेक त्रुटी असून याचिकाकर्त्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला स्थगिती द्यावी. न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत सांगितले की, निवडणूक तोंडावर असून या परिस्थितीत निवडणुकीला स्थगिती देता येणार नाही. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर याचिकाकर्त्यांना दाद मागता येईल. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना याचिका मागे घेण्याची परवानगी देत प्रकरण निकाली काढले.






























































