केंद्र सरकारच्या तिजोरीत सर्वात जास्त टॅक्सरूपाने पैसा देण्यात महाराष्ट्र राज्य नंबर वनवर आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (सीबीडीटी)ने टॅक्स कलेक्शनची आकडेवारी जाहीर केली असून या यादीनुसार, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून एकूण 19.62 लाख कोटी रुपये टॅक्स केंद्र सरकारला दिला आहे. महाराष्ट्रातून सर्वात जास्त टॅक्स दिला जातो. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एकूण डायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेश या राज्याने केवळ 48,333.44 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. तर बिहार राज्याने 2023-24 मध्ये एकूण डायरेक्ट टॅक्स कलेक्शन 6692.73 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
महाराष्ट्र या राज्यानंतर डायरेक्ट टॅक्स देण्यात दुसरे स्थान हे कर्नाटक राज्याचे आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कर्नाटकने 2.35 लाख कोटी रुपये डायरेक्ट टॅक्स दिला आहे. तिसऱ्या स्थानावर दिल्ली असून दिल्लीने डायरेक्ट टॅक्स म्हणून 2.03 लाख कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. चौथ्या स्थानावर तामीळनाडू राज्य असून या राज्याने 1.27 लाख कोटी रुपये डायरेक्ट टॅक्स दिला आहे. डायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स आणि सिक्योरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स येतो.
महाराष्ट्रातून 15 पट अधिक टॅक्स
एकटय़ा महाराष्ट्रातून केंद्र सरकारच्या तिजोरीत 7.62 लाख कोटी रुपयांचा डायरेक्ट टॅक्स देण्यात आला आहे. एकूण डायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये एकटय़ा महाराष्ट्राचे योगदान हे 39 टक्के आहे. तर उत्तर प्रदेशच्या तुलनेत 15 पट अधिक आहे. गुजरात हे राज्य या यादीत पाचव्या स्थानावर आहे. गुजरातने 84,439 कोटी रुपये दिले आहे. तर तेलंगणा सहाव्या, हरियाणा सातव्या, पश्चिम बंगाल आठव्या आणि नवव्या नंबरवर उत्तर प्रदेश हे राज्य आहे.