
>> आशिष बनसोडे
आरक्षणासाठी हजारो मराठा आंदोलक दक्षिण मुंबईत धडकले होते. इतक्या मोठय़ा संख्येने लोक एका ठिकाणी जमल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला होता. पण मुंबई पेलिसांच्या खाकीतल्या ‘विघ्नर्हर्त्यां’नी आपल्या लौकिकेला साजेशी कामगिरी केली. तब्बल 150 तास न थकता आंदोलनाचा बंदोबस्त पार पाडला. या बंदोबस्तामुळे अनेकांना घरच्या बाप्पाचे दर्शन घेता आले नाही, तर कोणाला आपला वाढदिवसदेखील कुटुंबियांसोबत साजरा करता आला नाही.
मराठा आंदोलकांचे आझाद मैदानात आंदोलन होणार असल्याने पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी बंदोबस्ताची चोख तयारी केली होती. 12 उपायुक्त, 14 सहाय्यक आयुक्त, 52 पोलीस निरीक्षक, 276 सपोनि व उपनिरीक्षक, दोन हजार 12 पोलीस कर्मचारी दक्षिण मुंबईत तैनात ठेवण्यात आले होते. पण आंदोलक आझाद मैदानाव्यतिरिक्त इतरत्रही ठिय्या देऊन होते. परंतु पोलिसांनी आपला संयम ढळू न देता सौजन्याची भूमिका घेत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली.
सहकाऱ्यांसोबत केक कापला
उपायुक्त निमित गोयल यांचा मंगळवारी वाढदिवस होता. पण पाच दिवसांपासून बंदोस्तासाठी तैनात असल्याने त्यांना कुठेही जाता येत नव्हते. अखेर त्यांनी मंगळवारी सकाळी सीएसएमटी परिसरात आपल्या सहकाऱयांसह केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. त्यांना कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा करण्याचा आनंद घेता आला नाही.
पहिल्यांदा गणपती बसवला पण…
आझाद मैदान विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी पहिल्यांदाच त्यांच्या घरी पाच दिवसांच्या बाप्पाची प्रतिष्ठापणा केली होती. पण बंदोबस्तामुळे घरीच जात न आल्याने कट्टे यांनी पाच दिवसांऐवजी घरच्या बाप्पाचे विसर्जन दहा दिवसांनी करायचे ठरवले. इतकेच नाही, तर घरात 14 महिन्यांची मुलगी असतानाही त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले.
सीएसएमटी रेल्वे स्थानकात आंदोलक थांबल्यामुळे रेल्वे पोलीस आयुक्त एम. के.कलासागर, उपायुक्त प्रज्ञा जेडगे, वरिष्ठ निरीक्षक संभाजी कटारे यांनी पाच दिवस स्थानकात ठाण मांडले होते. यांनी बंदोबस्तातच ऑनलाईन घरच्या बाप्पांचे दर्शन घेतले.
कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता उपायुक्त प्रवीण मुंढे, नवनाथ ढवळे, निमित गोयल, विजयकांत सागर, विशाल ठाकूर प्रेरणा कट्टे यांनी सहा दिवस दक्षिण मुंबई सोडली नाही. वडापाव खाऊन दिवस काढले, रात्री कार्यालयातच विश्रांती केली.