ती प्रकरणे समोर आली तर तुमचा पारदर्शक कारभार उघडा पडेल; बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर हल्लाबोल

balasaheb-thorat-radhakrish

राज्यातल्या तलाठी भरती परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या गैरव्यवहारावरुन आमदार रोहित पवार आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने हा मुद्दा उचलून धरत सरकारवर हल्लाबोल केला आहे. मात्र, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तलाठी भरतीमध्ये कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच यात भ्रष्टाचार झाल्याचे थोरातांनी सिद्ध केले तर मी राजकारणातून बाजूला होईल, असे आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. त्याला आता बाळासाहेब थोरात यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

आमदार रोहित पवार यांनी तलाठी भरती परीक्षेतील गैरप्रकाराचा मुद्दा लावून धरला होता. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही या प्रकरणावरुन विखे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर शासनाने परीक्षांचा निकाल अंतिम ठरवत मेरीट लिस्टमधील उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले. तलाठी भरती ही पारदर्शक पद्धतीने झाली असून आम्ही नवनियुक्त तलाठ्यांना नियुक्त पत्र देत आहोत. या तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचे थोरातांनी सिद्ध करावं, त्यांनी भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध केलं तर मी राजकारणातून बाजूला जाईल आणि थोरात भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाही तर त्यांनी बाहेर जावे, असे आव्हान विखे पाटील यांनी थोरात यांना दिले होते. त्यावर थोरात यांनी प्रतिक्रिया देताना विखेपाटीलावर हल्लाबोल केला.

बाळासाहेब थोरात यांनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या,असे मी म्हणणार नाही. मात्र सत्य लपवले तरी बदलणार नाही. तलाठी भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराचा गोपनीय अहवाल आपल्याच अखत्यारीत येणाऱ्या जिल्हाधिकारी महोदयांनी राज्याच्या अपर मुख्य सचिवांना याच वर्षी फेब्रुवारीत पाठविला आहे. आपण त्यावर काय कार्यवाही केली, हे सुद्धा जनतेला आणि विद्यार्थ्यांना सांगावे. या शिवाय तलाठी भरतीमध्ये झालेल्या गैरप्रकारांचे अजूनही ढीगभर प्रकरणे आहेत, जी समोर आणली तर तुमचा ‘पारदर्शक कारभार’ उघडा पडेल,” असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी पोस्टद्वारे दिला आहे.

बाकी प्रश्न राहिला रेटकार्डचा, तर महसूल मधील अधिकाऱ्यांनी आपल्या दोघांचाही कार्यकाळ बघितला आहे, सत्य काय ते सगळ्यांना माहित आहे. तुमचे म्हणजे, ‘सौ चूहे खा के बिल्ली चली हज को…’ असे झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी तुम्हाला अहवाल पाठवला आहे, पाहिजे असल्यास मी ही पाठवतो, असा टोलाही बाळासाहेब थोरात यांनी विखे पोटलांना लगावला आहे.