लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. तसेच महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेसलाही चांगला विजय मिळाला आहे. या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन काम केले. जिल्हा, ब्लॉक स्तरावर संघटनेला चालना दिली. उमेदवारी देतानाही सर्वांना विचारातून घेऊन निर्णय घेतला आणि सर्वांच्या एकजुटीने काँग्रेसने 13 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. एकजुटीची ही वज्रमुठ अशीच कायम ठेवणे गरजेचे आहे, असे मत काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला. तसेच लोकसभेची लढाई आपण जिंकली आहे आता विधानसभा हे आपले लक्ष्य असून असाच लढा देऊ व विधानसभेत महाविकास आघाडीचे सरकार आणू, असा निर्धारही चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित खासदारांची बैठक झाली. यावेळी सर्व नवनिर्वाचीत खासदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रमेश चेन्नीथला म्हणाले की, आघाडीचे राजकारण सोपे नसते पण सर्व घटक पक्षांशी चर्चा करुन महाविकास आघाडी मजबूत केली व निवडणुकीला सामोरे गेलो. भाजपच्या हुकूमशाही सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी ऐक्य केले आणि जनतेनेही काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त करत कौल दिला आहे. काँग्रेस पक्षावर जनतेने दाखवलेल्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.