बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील धोबीपछाडानंतर पक्षात एकटे पडलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता स्वपक्षातीलच विरोधकांच्या नाराजीचा सामना करावा लागणार आहे. गेल्या पाच वर्षांतील मुख्यमंत्रीपदाच्या आपल्या कारकीर्दीत फडणवीस यांनी एकीकडे भाजपमधील आपल्या अनेक विरोधकांना संपविले, तर दुसरीकडे दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना कायम अधिक महत्त्व दिले. फडणवीस यांच्याकडून मिळालेल्या या अपमानास्पद वागणुकीमुळे नाराज असलेल्या या विरोधकांकडून फडणवीस यांना मोठे आव्हान दिले जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना फडणवीस यांनी अलगद मंत्रिमंडळाबाहेरचा रस्ता दाखविला. एवढेच नव्हे तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांना मुक्ताईनगर विधानसभेतून तिकीटही दिले नाही. फडणवीस यांच्या या भूमिकेमुळे संतापलेल्या खडसे यांनी बंडाचा झेंडा फडकवताच त्यांची मुलगी रक्षा खडसे हिला उमेदवारी दिली, परंतु रक्षा खडसे यांचा पराभव झाला. वास्तविक रक्षा खडसे हिच्या पराभवामागे फडणवीस यांनीच पडद्यामागून हालचाली केल्याचे खडसे कुटुंबीयांना वाटते.

नाराज नेते नितीन गडकरींच्या वळचणीला

फडणवीस यांच्या या वृत्तीचा फटका पंकजा मुंडे यांनाही बसल्याचे बोलले जात आहे. पंकजा मुंडे यांचा परळी या मतदारसंघातून चुलत भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत होण्यास फडणवीस यांनीच पाठीमागून मदत केल्याचा संशय पंकजा यांना आहे. माजी मंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळेंसारख्या नेत्यांना उमेदवारी नाकारण्याचे खापरदेखील फडणवीसांवरच फुटले आहे. आता ही सर्व नाराज मंडळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वळचणीला जातील, असेही बोलले जात आहे.

पक्षाची कमान आता मराठा समाजाच्या हाती

या नाराजांचे नेतृत्व आता माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे करणार असल्याचे निश्चित असून फडणवीस यांना आव्हान देण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे खासमखास असलेले चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने पार्टीची सूत्रे आता मराठा समाजाकडे कायम राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र लोटस ‘फेल’ झाल्यामुळे केंद्रीय नेतृत्वदेखील फडणवीस यांच्यावर कमालीचे नाराज आहे. त्यामुळेच या केंद्रीय नेतृत्वाने राज्यात सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटीलसारखे नेतृत्व पुढे आणण्याचे ठरविले आहे, असे बोलले जाते.