राज्य सरकारने मोठा गाजावाजा सुरू करीत जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त तांत्रिक कारणामुळे लाडक्या बहिणीला दीड हजार रुपयांऐवजी एक रुपयाच मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणूक डोळय़ासमोर ठेवत महायुती सरकारने अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जाहीर केली. या योजनेत 21 ते 65 वर्षापर्यंतच्या महिलांना दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली. या योजनेचे फॉर्म ऑनलाईन-ऑफलाईनही भरण्याची मुभा आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त आतापर्यंत एक कोटी महिलांनी नोंदणी केलेली आहे. पुढील महिन्यापर्यंत दोन कोटी पन्नास लाख महिलांची नोंदणी अपेक्षित आहे. पण त्यातील 10 ते 15 टक्के अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद होण्याची शक्यता आहे अशी भीती महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी मागील आठवडय़ात व्यक्त केली होती.
मात्र यावर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. या योजनेतील पात्र महिलांचे मराठी भाषेतील अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीतील अर्ज नामंजूर होणार नाही. या योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडे एक कोटीहून अधिक महिलांचे अर्ज आले आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमाहोईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा करणार आहोत. एक रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी मराठीतून केलेले अर्ज बाद होतील असे वृत्त सध्या सोशल मीडियावर पसरले आहे. त्यामुळे काही महिलांनी पुन्हा फॉर्म भरण्यास सुरुवात केली आहे.