
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) 2024 स्पर्धेत सहाव्या दिवशी पहिल्या लढतीत विशांत मोरे (68 धावा) व मेहुल पटेल (45धावा) यांनी केलेल्या भागीदारीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स संघाचा 13 धावांनी पराभव करत दुसरा विजय मिळवला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूर टस्कर्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रायगड रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 185धावा केल्या. नौशाद शेख (0) खाते न उघडताच तंबूत परतला. त्यापाठोपाठ सिद्धेश वीर (20), रोहन मारवाह (10) हे वरच्या फळीतील फलंदाज पॉवरप्ले संपेपर्यंत झटपट बाद झाले. त्यावेळी 3बाद 57 अशी स्थिती होती. विशांत मोरे व मेहुल पटेल यांनी चौथ्या विकेटसाठी 60 चेंडूंत 93 धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. विशांत मोरेने 47 चेंडूत 68 धावांची झंझावाती खेळी करून सामन्यात रोमांच आणला. त्यात त्याने 6 चौकार व 2 षटकार खेचले. त्याला मेहुल पटेलने 31 चेंडूत 5चौकार व 1 षटकारासह 45धावांची खेळी करून साथ दिली. कोल्हापूरचा फिरकीपटू श्रेयस चव्हाणने स्वतःच्या गोलंदाजीवर विशांत मोरेला झेलबाद केले. तर श्रीकांत मुंढेने मेहुल पटेलला आक्रमक फटका मारताना झेलबाद केले. त्यानंतर ऋषभ राठोडने नाबाद 26 धावांची खेळी करून रायगड रॉयल्स संघाला 185 धावांचे आव्हान उभे करून दिले. कोल्हापूर टस्कर्सकडून निहाल तुसामत (2-29), योगेश डोंगरे (2-19), तरणजित धिल्लोन (1-14), श्रीकांत मुंढे (1-33), श्रेयस चव्हाण (1-33) यांनी सुरेख गोलंदाजी केली.




























































