
राज्यातील खासगी कोचिंग क्लासच्या मनमानीला चाप लावण्यासाठी स्वतंत्र कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. नव्या कायद्यानुसार प्रत्येक कोचिंग क्लासची सरकारकडे नोंदणी सक्तीची राहील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस, अग्निशमन दल, स्थानिक पालिकांची परवानगी बंधनकारक होईल. रोखीमध्ये फी घेण्यावर निर्बंध येणार आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास 50 लाखांपर्यंत दंडाची तरतूद असून याची अधिसूचना लवकरच जारी होणार आहे.
राज्यातील खासगी कोचिंग क्लासच्या मनमानीवर अंपुश ठेवण्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र कायदा तयार करणार असून खासगी शिकवणी वर्ग नोंदणी व अधिनियम 2026 तयार करण्याची प्रक्रिया तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली होती.
या कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. हा मसुदा लवकरच शालेय शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यानंतर पुढील एका महिन्यात पालक, विद्यार्थी, शिक्षक व कोचिंग क्लासच्या चालकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने 2024मध्ये सर्व राज्यांसाठी कोचिंग क्लास मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या.
नियमांची व्याप्ती वाढवली
आतापर्यंत कोचिंग क्लासच्या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे फक्त 11वी, 12वी आणि स्पर्धा परीक्षांसाठी होती. पण या नवीन कायद्यानुसार तेरा वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे इयत्ता आठवीपासूनच हे नियम लागू होतील.
सुरक्षित जागा बंधनकारक
प्रत्येक क्लासची जागा सुरक्षित असणे बंधनकारक आहे. क्लासच्या इमारतीला सीसी प्रमाणपत्र आवश्यक आहे. पोलीस, अग्निशमन दल व स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी गरजेची राहील.
सरकारने ठरवून दिलेल्या स्वरूपातच शुल्काची पावती देणे बंधनकारक राहील. यामुळे रोखीत शुल्क घेऊन कर न भरण्याची प्रथा बंद होईल. पालकांकडे शुल्काचा पुरावा राहील.
प्रत्येक वर्गात आणि व्हरांडा व इतर मोकळ्या जागेत सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा लागेल. त्याचे चित्रीकरण एक महिना जपून ठेवावे लागेल. यामुळे विद्यार्थ्यांची तक्रार आल्यास तपास करता येईल.
क्लासमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण, छेडछाड किंवा पोक्सो अंतर्गत गुन्हा घडल्यास क्लासच्या व्यवस्थापनाला चोवीस तारास पोलिसांना लेखी तक्रार द्यावी लागेल.
प्रत्येक कोचिंग क्लासची सरकारकडे स्वतःहून नोंदणी करावी लागेल. क्लासच्या मालकाचे नाव, पत्ता, शुल्काची रक्कम, प्रत्येक तुकडीतील विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षक-विद्यार्थी प्रमाण याचीही माहिती द्यावी लागेल.




























































