
देशभरात रेल्वेगाड्यांमध्ये पडणाऱ्या दरोड्यांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात आणि तामीळनाडू यांचा टॉप पाच राज्यांमध्ये समावेश आहे. गेल्या वर्षभरात रेल्वेगाड्यांमध्ये तब्बल 167 कोटी रुपयांची लूट झाली असून 74 हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग अर्थात ‘एनसीआरबी’च्या अहवालात याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
डोंगराळ भागात चोऱ्या कमी
डोंगराळ भाग रेल्वेगाड्यांसाठी सुरक्षित असल्याचे उघड झाले आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीरसह आसाम, त्रिपुरासारख्या डोंगराळ भाग असलेल्या राज्यांमध्ये रेल्वेगाड्यांमध्ये कमी प्रमाणात चोऱ्या झाल्याचे समोर आले आहे, मात्र या राज्यांमध्ये रेल्वे सेवा मोठय़ा प्रमाणावर नसल्याची बाबही तितकीच खरी आहे.
राज्य व प्रकरणं
हिमाचल – 2
त्रिपुरा – 3
जम्मू-कश्मीर – 18
उत्तराखंड – 90
केरळ – 175
वर्षभरात रेल्वेगाड्यांमधील गुन्ह्यांत 3.6 टक्के वाढ
2016 च्या तुलनेत 2017 मध्ये देशभरात रेल्वेगाड्यांमधील गुन्ह्य़ात 3.6 टक्के वाढ झाली आहे. तब्बल 50 लाख 7 हजार 44 गुन्हे दाखल झाले असून 2016 मध्ये ही संख्या 48 लाख 31 हजार 515 इतकी होती.
दोन वर्षांतच 45 टक्के गुन्हे वाढले
‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार देशभरात रेल्वेगाडय़ांमध्ये घडणाऱया गुह्यांमध्ये दोन वर्षांत 45 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2017 मध्ये 11 लाखांहून अधिक गुन्हे घडले. यात 70 टक्क्यांहून अधिक चोरी आणि लुटमारीच्या घटना घडल्या. 2017 मध्ये 74 हजार 317 प्रकरणांमध्ये चोरीच्या गुह्यांची नोंद झाली. यात 12 हजारांहून अधिक प्रकरणे मेट्रो रेल्वेतील आहे. विशेष म्हणजे ज्या मालमत्ता किंवा रोकड चोरीला गेली त्यांची किंमत तब्बल 157 कोटी रुपये इतकी सांगण्यात येत आहेत.
वर्ष व गुन्हे
2015 – 9,42,258
2016 – 10,68,859
2017 – 11,15,839
रेल्वेगाडय़ांमध्ये सर्वाधिक हत्या प्रकरणे हरयाणात
विविध कारणांमुळे 2017 मध्ये रेल्वेगाडय़ांमध्ये हत्या होण्याची सर्वाधिक प्रकरणे हरयाणात घडली असून यात 209 प्रकरणांचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये पश्चिम बंगाल दुसऱया क्रमांकावर असून आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेले आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यांचाही टॉप 5 राज्यांमध्ये समावेश आहे.
राज्य व प्रकरणे
हरयाणा – 43
पश्चिम बंगाल – 33
बिहार – 21
आंध्र प्रदेश – 19
कर्नाटक – 17



























































