
भाजपला ठरवून बाजूला करायचं नाही, पण जर ते शब्द पाळणार नसतील तर मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मुख्यमंत्रीपद देण्यास तयार असाल तरच आम्हाला फोन करा; अन्यथा करू नका, असा स्पष्ट संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजपला दिला.
‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना तसेच सहयोगी नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला सर्व 64 आमदार उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेची स्थापनाच मराठी माणसाच्या स्वाभिमानातून झाली आहे. केवळ भाजपची कोंडी करायची म्हणून हे सगळं करीत नाही. लोकसभेवेळी जे ठरलंय ते व्हावं, बाकी काही अपेक्षा नाही. ठरल्यापेक्षा कणभरदेखील अधिक शिवसेनेला नको आहे.
मुख्यमंत्र्यांचं विधान चुकीचं
मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षं पहिली की नंतरची हा वाद नव्हता. मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान अत्यंत चुकीचं आहे. जर ते मी खोटं बोलत होतो हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतील तर हे योग्य नाही. भाजप दिलेला शब्द पाळणार नसेल तर मग चर्चा करण्यात अर्थ नाही. माझा निर्णय मी योग्य वेळी जाहीर करीन, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावले.
























































