एसटी कर्मचाऱ्यांना पीएफ फंडातून तातडीने कर्जे द्या, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची मागणी

एसटी कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत भविष्य निर्वाह (पीएफ) निधीमधून तातडीने कर्जे उपलब्ध करून द्या, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे केली आहे. पीएफ फंडातून कर्ज देण्याचा पर्याय बंद केल्यामुळे कामगारांची आर्थिक कोंडी झाली आहे.

महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी यासंदर्भात राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांना निवेदन दिले आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना कमी वेतनामध्ये जीवन जगणे कठीण होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पीएफ फंडातून कर्ज मिळवण्यासाठी सादर केलेले अर्ज ऑक्टोबर 2024 पासून प्रलंबित आहेत. परिणामी कर्मचाऱ्यांना मुलामुलींचे विवाह, शिक्षण, गंभीर आजारपण याचा खर्च भागवताना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पीएफ फंडातून कर्ज देण्याची प्रक्रिया मार्गी लावा, अशी मागणी एसटी कामगार सेनेने केली आहे. तसेच महामंडळाच्या निवृत्त अधिकारीकर्मचाऱ्यांना मोफत प्रवासी पास सुविधा एक वर्षाची करा आणि कागदी पासऐवजी स्मार्ट कार्ड योजना राबवा, या मागण्यादेखील केल्या आहेत.