आता विजेचा खेळखंडोबा थांबणार!

510
electricity

राज्यात वारंवार बत्ती गुल होत असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. ती टाळण्यासाठी महावितरण आता उच्च दाब वीजवाहिन्यांवर वॉच ठेवणार आहे. सध्या प्रत्येक विभागात देखभाल-दुरुस्तीसाठी नियोजित भारनियमन केले जाते. त्याशिवाय तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांच्या संतापाचा सामना करावा लागतो. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी उच्चदाब आणि लघुदाब वीज वाहिन्यांच्या परिसरात गस्त घालण्याचे आदेश संबंधित  विभागाला दिले आहेत.

महावितरणचे राज्यभरात सुमारे अडीच कोटी वीज ग्राहक असून त्यांना दररोज जवळपास 21 हजार मेगावॅटपर्यंत वीज पुरवली जाते. वीज वितरणचे राज्यभर जाळे असल्याने त्याच्या देखभालीसाठी दररोज कुठे ना कुठे वीज पुरवठा खंडित केला जातो. त्याशिवाय तांत्रिक बिघाडामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होते. महावितरणच्या या सुमार सेवेचा ग्राहकांना फटका बसतो. त्याची महावितरणच्या व्यवस्थापनाने गंभीर दखल घेतली असून यापुढे अचानक होणारे तांत्रिक बिघाड कमी करण्यासाठी ज्या परिसरात उच्च व लघुदाब वीज वाहिन्या आहेत त्या परिसरात दैनंदिन गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोणत्या ठिकाणी तांत्रिक बिघाड होऊ शकतो याचा अंदाज घेऊन दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. त्याचबरेबर वीज वाहिन्यांच्याखाली बेकायदेशीरपणे होणाऱ्या बांधकामांवरही नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

महापारेषणसोबत समन्वय ठेवून देखभाल-दुरुस्ती करा

वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये तयार होणारी वीज महापारेषण उच्चदाब वीज वहिन्यांच्या माध्यमातून महावितरणपर्यंत पोहचवते. ही वीज महावितरण उच्चदाब आणि लघुदाब वाहिन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना पुरवते. त्यामुळे महापारेषण ज्यावेळी देखभाल-दुरुस्तीसाठी ब्लॉक घेत त्याचवेळी त्यांच्याशी समन्वय ठेवून वीज पुरवठा बंद असताना महावितरणने आपलीही देखभाल-दुरुस्तीची कामे करावीत असे आदेश महावितरणने राज्यातील आपल्या सर्व मुख्य अभियंत्यांना दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या