विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मिंधे सरकारकडून घोषणांचा गरबा आणि निर्णयांचा दांडिया सुरू आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत अंजेडय़ावर सातच विषय असताना आयत्यावेळी तब्बल 49 निर्णय घेण्यात आले. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना अनेक प्रकल्पांवर निधीची उधळण करण्यात आली.
रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरच्या पुनर्विकासाला गती देणार
घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देण्यासाठी एमएमआरडीएला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विक्रीतून मिळणाऱया रकमेतून हे अधिमूल्य भरायचे आहे.
बोरिवली-ठाणे सहापदरी भुयारी मार्गासाठी 18 हजार कोटी
ठाणे ते बोरिवली या भुयारी मार्गासाठी 18 हजार 838 कोटी 40 लाख रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या सहापदरी मार्गाच्या दुहेरी-भुयारी मार्गाची लांबी 11. 85 किमी अशी असून या प्रकल्पाची एमएमआरडीए मार्फत अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासाठी 9 हजार कोटींचे कर्ज
ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देण्यासाठी एमएमआरडीएला बिनव्याजी कर्ज सहाय्य देण्यास मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प 9 हजार 158 कोटींचा असून, 1 हजार 354 कोटी 66 लाख रुपये बिनव्याजी दुय्यम कर्ज म्हणून दिले जाणार आहेत.
सरकारी कर्मचाऱयांसाठी घोषणा; ग्रॅच्युइटी 14 लाखांवरून 20 लाख
राज्यातील निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्तीधारकांना सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा 14 लाखांवरून वाढवून 20 लाख रुपये करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी 1 सप्टेंबर 2024 पासून करण्यात येईल.