राज्यावरील कर्ज वाढत असल्याची अजित पवार यांची कबुली, आर्थिक शिस्त ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न

राज्यावरील कर्ज वाढत आहे. उत्पादनाच्या किती टक्के कर्ज काढले पाहिजे, हे ठरवून दिले आहे. त्या मयदिच्या बाहेर जाऊ देत नाही. त्यामुळे देशात चांगली पत रहाते. आर्थिक शिस्त ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केला आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील डीजे, ध्वनी साऊंडवरील बंधने सरकारने आणली नाहीत. नागरिकांना त्रास होत असल्यामुळेच न्यायालयाने बंधने आणली आहेत. बैलगाडी शर्यतीप्रमाणे गणेशोत्सवासह महत्त्वाच्या सणांवरील बंधने उठविण्यासाठी न्यायालयात बाजू मांडली जाईल, असेही पवार म्हणाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने 2024 मध्ये घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्या मंडळांना उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमाला आमदार हेमंत रासने, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, अजित गव्हाणे आदी उपस्थित होते.

अजित पवार पुढे म्हणाले, गणेशोत्सव राज्य उत्सव म्हणून साजरा केला जाईल. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू ठेवण्यासाठी काही दिवस राखीव असतात. त्यातील काही दिवस गणेशोत्सवासाठी दिले जातील. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सवातून कार्यकर्ता तयार होतो. जगातील पावणेदोनशे देशात गणेशोत्सव पोहोचला आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून चुकीचे काम होऊ नये. सामाजिक सलोखा जपावा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही पवार यांनी केले.

दरम्यान, गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत मेट्रो धावेल. पहाटेही लवकर मेट्रो सेवा सुरू करण्यात येईल. याबाबत महामेट्रो प्रशासनाला सूचना दिल्या जातील, असे आश्वासन पवार यांनी दिले.

कोंडी सोडवण्यासाठी रस्ते रुंदीकरणाशिवाय पर्याय नाही

रस्ते विकास महामंडळ, पीएमआरडीएचा पुणे, पिंपरी-चिंचवडमधील रिंगरोडसह मोठी कामे हाती घेतली आहेत. यात जमीन जाणारे शेतकरी नाराज होतील. परंतु, भविष्याचा विचार करून निर्णय घ्यावे लागतील. कोंडी सोडवण्यासाठी रस्ते रुंदीकरण करण्याशिवाय पर्याय नाही. पिंपरी-चिंचवडमधील रस्ते रुंद करणे, उड्डाणपूल करण्यासाठी अनेकजण माझ्यावर नाराज झाले होते. त्यावेळी काम करताना किती अडचणी आल्या हे मला माहिती आहे. त्यामुळे विकासकामे करताना सर्वांना खूश ठेवू शकत नाही, असे पवार म्हणाले.