दहावीपर्यंत तिसरी भाषा हद्दपार! शालेय शिक्षण विभागाचा अभ्यासक्रमाचा नवा मसुदा तयार, अभिप्राय मागवले

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते दहावीसाठी नवीन अभ्यासक्रम मसुदा तयार केला आहे. यामध्ये इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीची करणाऱया शालेय शिक्षण विभागाने आता आपल्या भूमिकेपासून फारकत घेऊन इयत्ता तिसरी ते दहावीच्या प्रस्तावित अभ्यासक्रमातूनही तिसरी भाषा हद्दपार केली आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र तसेच कलाशिक्षण, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि पायाभूत मूल्य शिक्षणाचे विषय समाविष्ट करण्यात आले आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयार केलेला हा ‘अभ्यासक्रम मसुदा 2025 www.maa.ac.in या वेबसाईटवर उपलब्ध असून 28 जुलैपासून नागरिकांना अभिप्राय देता येणार आहेत, अशी माहिती ‘एससीईआरटी’चे संचालक राहुल रेखावार यांनी दिली.

हा अभ्यासक्रम मसुदा ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा’ आणि ‘राज्य अभ्यासक्रम आराखडय़ा’च्या मार्गदर्शनानुसार तयार करण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमात विषयांचे समाकलन, सृजनशीलता, प्रयोगशीलता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. अभ्यासक्रम तयार करत असताना भारतीय ज्ञानप्रणाली, मूल्ये आणि स्वभाववृत्ती, पर्यावरण विषयक अध्ययन आणि काळजी, शाळांमधील समावेशन, शाळांमध्ये मार्गदर्शन आणि समुपदेशन, शाळेतील शैक्षणिक तंत्रज्ञान या आंतरसमवाय क्षेत्रांचा विविध विषयांमध्ये एकात्मिक स्वरूपात समावेश करण्यात आला आहे.

सद्यस्थितीतील तिसरी ते पाचवीसाठी असणाऱ्या ‘परिसर अभ्यास विषयांऐवजी ‘आपल्या सभोवतालचे जग विषय लागू करण्यात येतील. भाग एकमध्ये विज्ञान व भूगोल विषयातील आशयाचा समावेश असेल आणि भाग दोनमध्ये इतिहास व नागरिकशास्त्र विषयातील आशयाचा समावेश असेल. इयत्ता चौथीसाठीचे ‘शिवछत्रपती’ हे पाठ्यपुस्तक कायम ठेवण्यात येईल. इ. तिसरीसाठी जिल्हा, चौथीसाठी राज्य व पाचवीसाठी देश अशा पद्धतीने आशय आहे.

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये

  • सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचे स्वतंत्र विषय.
  • नववी-दहावीसाठी आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि पर्यावरण शिक्षण.
  • इयत्तानिहाय भारतीय ज्ञान प्रणाली, राज्यघटनात्मक मूल्ये, शाश्वत विकास, सामाजिक समावेशन आणि उद्योजकता काैशल्य यांचा समावेश.

अकरावी व बारावीचा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अंतिम केल्यानंतर त्या आधारे राज्य मंडळाच्या अकरावी, बारावीचा अभ्यासक्रम एससीईआरटीमार्फत तयार करण्यात येणार आहे.

त्रिभाषा सूत्राबाबत काय?

डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा धोरण अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली असून तिच्या शिफारशींचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. तोपर्यंत सध्याची अभ्यासक्रम प्रणाली आहे तशी सुरू राहील, असे ‘एससीईआरटी’कडून सांगण्यात आले. मराठी भाषेचा अभ्यासक्रम अंतिम झाल्यानंतर, मराठी भाषेचा आधार घेऊन अन्य प्रथम व द्वितीय स्तराच्या भारतीय भाषांचा अभ्यासक्रमांमध्ये बदल करण्यात येईल.